भारत करु शकतो तर आपण का नाही?, पाकिस्तानी नेता म्हणाला...विकासासाठी लोकसंख्या नियंत्रण गरजेचे!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2023 12:49 PM2023-03-13T12:49:03+5:302023-03-13T12:49:33+5:30
पाकिस्तान सध्या गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये नेमकं आपलं चुकलं कुठे यावर चर्चा सुरू झाली आहे.
पाकिस्तान सध्या गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये नेमकं आपलं चुकलं कुठे यावर चर्चा सुरू झाली आहे. शेजारचा भारत इतका पुढे गेला आणि आपण विनाशाच्या उंबरठ्यावर आलो आहोत, अशी भावना पाकिस्तानातील नेते व्यक्त करत आहेत. आता पाकिस्तानच्या माजी अर्थमंत्र्यांनी एक मोठं विधान केलं आहे. एका कार्यक्रमादरम्यान ते म्हणाले की, पाकिस्तानला आपल्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे, तसंच शिक्षण प्रणाली सुधारण्याची गरज आहे.
पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री मिफ्ताह इस्माइल यांनी 'रिइमॅजिनिंग पाकिस्तान' या चर्चासत्राला संबोधित करताना आपलं मत मांडलं. "भारत, बांगलादेश आणि इतर अनेक इस्लामिक देशांमध्ये जन्मदर पाकिस्तानपेक्षा खूपच कमी आहे. पाकिस्तानमध्ये दरवर्षी सुमारे ५५ लाख मुले जन्माला येतात आणि पाकिस्तानमधील जन्मदर जगात सर्वाधिक आहे. जर पाकिस्तानचा जन्मदर गेल्या दहा वर्षांत बांगलादेशच्या बरोबरीचा असता तर पाकिस्तानचे दरडोई उत्पन्न १० टक्क्यांनी वाढले असते. वाढत्या लोकसंख्येमुळे पाकिस्तान मानव विकास निर्देशांकात तळाशी आहे. आफ्रिकन देशांपेक्षाही खाली गेला आहे. शाश्वत आणि जलद विकासासाठी पाकिस्तानला लोकसंख्येवर नियंत्रण ठेवावे लागेल", असं मिफ्ताह इस्माइल म्हणाले.
शिक्षणावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं
पाकिस्तानच्या माजी अर्थमंत्र्यांनी देशाच्या विकासासाठी शिक्षणावर भर देण्यावर लक्ष केंद्रीत केलं. ते म्हणाले की, पाकिस्तानातील ५० टक्के मुले शाळेत शिकत नाहीत. पाकिस्तानमध्ये केवळ ४४ टक्के मुले हायस्कूलमध्ये प्रवेश घेतात, तर भारतात हे प्रमाण ८५ टक्के इतके आहे. जग भारताच्या आयआयटीला उच्च दर्जाचं मानते. आता पाकिस्तानच्या माजी मंत्र्यानेही कबूल केले आहे की भारतातील आयआयटी जगातील सर्वोच्च संस्थांमध्ये आहे आणि या संस्थांमधून शिकलेले लोक आज जगातील सर्वोच्च कंपन्यांचे सीईओ आहेत. भारतात सर्व उत्तम विद्यापीठे सुरू होत असताना, पाकिस्तानातील सरासरी तरुण तीन महिन्यांचा डिप्लोमा करत आहे. शिक्षणाचा दर्जा सुधारल्याशिवाय पाकिस्तानची प्रगती होऊ शकत नाही, असं मिफ्ताह इस्माईल म्हणाले.
महिला सक्षमीकरण आवश्यक
महिला सक्षमीकरणावरही मिफ्ताह इस्माईल यांनी भर दिला. बांगलादेशच्या निर्यातीत वाढ झाल्याचे श्रेय त्यांनी महिला शिक्षणाला दिले. देशाच्या ५० टक्के लोकसंख्येकडे दुर्लक्ष करून पाकिस्तान पुढे जाऊ शकत नाही. मिफ्ताह इस्माईल म्हणाले की, जर भारत आणि बांगलादेश हे करू शकत असतील तर आपणही चांगल्या नेतृत्वाच्या जोरावर ते करू शकतो.