"भारत चंद्रावर पोहोचला, पाकिस्तान अजूनही जमीनीवरच, याला जबाबदार.."; नवाझ शरीफांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 05:46 PM2023-12-21T17:46:25+5:302023-12-21T17:48:12+5:30
नवाझ शरीफ चौथ्यांदा पाकिस्तानच्या पंतप्रधान पदाच्या शर्यतीत
Nawaz Sharif Pakistan vs India: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ सध्या भारताचे कौतुक करताना दिसत आहेत. त्यांनी गेल्या काही दिवसात स्वत:चा देश पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवरही टीका केली आहे. 'जरा भारताकडे बघा, तो देश आज चंद्रावर पोहोचला आहे, त्यांची चंद्रयान-३ मोहिम यशस्वी झाली आहे. पण पाकिस्तान अजूनही जमिनीवरच येत आहे. या आर्थिक संकटाला सरकारी यंत्रणाच जबाबदार आहे. नियोजन नीट असते तर आज पाकिस्तानही फार पुढे असता. नवाझ शरीफ नुकतेच असेही म्हणाले होते की, देशाच्या आर्थिक संकटाला भारत किंवा अमेरिका जबाबदार नाही. त्यानंतर आता त्यांनी पाकिस्तानला आरसा दाखवला आहे.
ब्रिटनमधून परतलेले नवाझ शरीफ सध्या पुन्हा एकदा आपले राजकीय नशीब आजमावण्याच्या तयारीत आहेत. पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणुका आहेत आणि त्याआधी ते सतत रॅलीच्या माध्यमातून जनतेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. देशाच्या आर्थिक संकटासाठी पाकिस्तानी लष्कर आणि इम्रान खान यांच्या सरकार जबाबदार आहे. आमचा शेजारी चंद्रावर पोहोचला आहे पण आम्ही अजूनही जमिनीवरच आहोत आणि हे सतत घडत आहे, असे ते म्हणाले.
आर्थिक संकटाला भारत जबाबदार नाही
पाकिस्तानच्या आजच्या आर्थिक संकटाला अमेरिका, भारत किंवा अफगाणिस्तान जबाबदार नाही, असे नवाझ शरीफ म्हणाले. नवाझ यांच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे. २०१८च्या निवडणुकीत फसवणूक करून इम्रान खान यांनी सत्ता बळकावली असा आरोप करत त्यांनी पाकिस्तानी लष्कराला लक्ष्य केले आहे.