Imran Khan Arrested, BREAKING: मोठी बातमी! पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2023 03:10 PM2023-05-09T15:10:31+5:302023-05-09T15:11:15+5:30
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना राजधानी इस्लामाबादमध्ये अटक करण्यात आली आहे.
Imran Khan Arrested: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना राजधानी इस्लामाबादमध्ये अटक करण्यात आली आहे. इम्रान खानचा पक्ष पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे (PTI) वकील फैसल चौधरी यांनी माजी पंतप्रधानांच्या अटकेच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पाकिस्तान रेंजर्सनी इम्रान खान यांना इस्लामाबाद उच्च न्यायालयाबाहेरून अटक केली. इम्रान खान यांना 'अल्कादिर ट्रस्ट प्रकरणात' अटक करण्यात आली आहे. पीटीआयचे नेते इम्रान यांना अटक केल्यानंतर त्यांचे समर्थक संतप्त झाले आहेत. इम्रानच्या अटकेनंतर पीटीआयने निषेधाची घोषणा केली आहे.
Former Pakistan PM & PTI chief Imran Khan has been arrested from outside the Islamabad High Court (IHC) by Rangers, reports Pakistan's Dawn News pic.twitter.com/FHFTw3wUbr
— ANI (@ANI) May 9, 2023
----
Rangers abducted PTI Chairman Imran Khan, these are the visuals. Pakistan’s brave people must come out and defend their country. pic.twitter.com/hJwG42hsE4
— PTI (@PTIofficial) May 9, 2023
इम्रान खानच्या अटकेनंतर इस्लामाबाद पोलिसांनीही एक निवेदन जारी केले आहे. इस्लामाबादचे महानिरीक्षक (IG) म्हणाले की, इम्रान यांना कादिर ट्रस्ट प्रकरणात अटक करण्यात आली आहे. सध्या परिस्थिती सामान्य आहे. IG यांनी सांगितले की कलम 144 लागू करण्यात आली आहे. कोणीही नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. त्याचवेळी, पीटीआयच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून केलेल्या ट्विटमध्ये, उच्च न्यायालयाबाहेर अटकेदरम्यान झालेल्या हाणामारीत इम्रानचे वकील गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात आले आहे.
Imran Khan’s lawyer badly injured inside the premises of IHC. Black day for our democracy and country. pic.twitter.com/iQ8xWsXln7
— PTI (@PTIofficial) May 9, 2023
काय म्हणाले इम्रान यांच्या पक्षाचे नेते?
पीटीआयचे उपाध्यक्ष फवाद चौधरी यांनी लोकांना घराबाहेर पडण्याचे आवाहन केले. इस्लामाबाद उच्च न्यायालयात हल्ला झाला आहे. इम्रान खानला अटक करण्यात आली आहे. त्यांची अटक म्हणजे न्यायालयीन यंत्रणा बंद पाडण्यासारखे आहे. उच्च न्यायालयाला रेंजर्सनी घेराव घातला असून वकिलांचा छळ होत आहे, असे फवाद चौधरी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, इम्रान खान यांच्या कारला देखील चारही बाजूंनी घेरण्यात आले होते.
पीटीआय नेते अझहर मशवानी यांनी आरोप केला की, इम्रान यांचे न्यायालयाबाहेर रेंजर्सनी 'अपहरण' केले. ते म्हणाले की, पक्षाने तत्काळ प्रभावाने देशभरात निदर्शने सुरू करण्याची घोषणा केली आहे. पक्षाच्या आणखी एका नेत्याने सांगितले की, इम्रान खान यांचा छळ केला जात आहे. रेंजर्सने इम्रान खान यांना मारहाण केली आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणतात...
दरम्यान, जिओ न्यूजच्या वृत्तानुसार, पंतप्रधान शरीफ म्हणाले की राजकीय फायद्यासाठी पाकिस्तानी सैन्य आणि गुप्तचर संस्थेला नियमितपणे बदनाम करणे आणि धमकावणे हे खानचे पाऊल अत्यंत निषेधार्ह आहे. जनरल फैसल नसीर आणि आमच्या गुप्तचर संस्थेच्या अधिकाऱ्यांवर कोणत्याही पुराव्याशिवाय आरोप करणे योग्य नाही आणि ते खपवून घेतले जाणार नाही, असेही पंतप्रधान म्हणाले.
माजी राष्ट्रपती झरदारींची इम्रान खान यांच्यावर टीका
माजी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी म्हणाले की, पीटीआय प्रमुखांनी संस्थांना बदनाम करण्यासाठी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत, जे यापुढे खपवून घेतले जाणार नाही. झरदारी यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, "संस्थांना बदनाम करण्याच्या प्रयत्नामुळे माणसाचा खरा चेहरा समोर आला आहे आणि तेवढे पुरेसे आहे. त्यांचे भाषण ऐकून कोणीही देशभक्त परदेशी एजंटच्या मागे जाण्याचा विचारही करू शकत नाही. झरदारी म्हणाले की, पाकिस्तानी लष्करातील धाडसी आणि प्रतिष्ठित अधिकाऱ्यांवरील आरोप म्हणजे संपूर्ण पाकिस्तान ज्या संस्थेच्या पाठीशी उभा आहे, त्या संस्थेवरचा हल्ला आहे. एक माणूस आपल्या निष्पाप कार्यकर्त्यांना खोटे आणि कपटाने मूर्ख बनवत होता, त्याचे पतन मी पाहत आहे. आम्ही एका व्यक्तीला आमच्या मूल्यांशी आणि देशाशी खेळू देणार नाही."