एकाच दिवशी पेट्रोल २४ रुपयांनी वाढले; पाकिस्तानात डिझेलची किंमत तर सर्वात जास्त
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 09:44 AM2022-06-16T09:44:03+5:302022-06-16T10:08:55+5:30
गेल्या दोन वर्षांपासून पाकिस्तानी लोक महागाईत होरपळले आहेत. आता या इंधनवाढीमुळे वस्तू आणखी महागणार आहेत. यामुळे श्रीलंकेसारखी उद्रेकाची स्थिती उद्भवण्याची शक्यता आहे.
इस्लामाबाद : इम्रान खान सरकार गेले आणि पाकिस्तानी नागरिक आणखी संकटात सापडले आहेत. शाहबाज शरीफ सरकार सत्तेत आल्या आल्याच त्यांनी पेट्रोल डिझेलचे दर प्रति लीटर ३० रुपयांनी वाढवले होते. आता पुन्हा एकाच दिवसात २४ रुपयांनी दर वाढले आहेत.
पाकिस्तानात आता एक लीटर पेट्रोलची किंमत 233.89 रुपयांवर गेली आहे. तर डिझेलच्या किंमतीत 16.31 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तिथे एक लीटर डिझेलचा दर 263.31 रुपये झाला आहे. पाकिस्तान सरकारने बुधवारी या दरवाढीची घोषणा केली. पाकिस्तानमध्ये गेल्या २० दिवसांत तिसऱ्यांदा अशाप्रकारे दर वाढले आहेत. हे नवे १५ जूनच्या रात्रीपासून लागू झाल्याची घोषणा पाकिस्तानच्या अर्थमंत्र्यांनी केली.
गेल्या दोन वर्षांपासून पाकिस्तानी लोक महागाईत होरपळले आहेत. आता या इंधनवाढीमुळे वस्तू आणखी महागणार आहेत. यामुळे श्रीलंकेसारखी उद्रेकाची स्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. पाकिस्तानी सरकार आणि आंतरराष्ट्रीय नाणे निधी यांच्यातील कतारमधील चर्चा निष्फळ राहिली आहे. गेल्याच महिन्यात पेट्रोल, डिझेलवरील सबसिडी बंद करा, मग पैसे देण्याबाबत पुढे बोलू असे आयएमएफने पाकिस्तानला सुनावले होते. परदेशी बँकांनीदेखील पाकिस्तानच्या रिफायनरींना कच्चे तेल खरेदी करण्यासाठी व्यापारी कर्ज देण्यास नकार दिला आहे. तर पुरवठादार देशातील राजकीय परिस्थिती बिघडल्याने आगाऊ रक्कम देण्याची मागणी करत आहेत.
रॉकेलची किंमत 29.49 रुपयांनी वाढून 211.43 रुपये झाली आहे. लाइट डिझेल 29.16 रुपयांच्या वाढीनंतर 207.47 रुपये होईल. पाकिस्तानचे अर्थमंत्री मिफ्ताह इस्माइल यांनी सांगितले की, आजही पेट्रोलमध्ये 24.03 रुपये, डिझेलमध्ये 59.16 रुपये, रॉकेलमध्ये 29.49 रुपये आणि लाईट डिझेलमागे 29.16 रुपयांचे नुकसान होत आहे. सरकार पेट्रोल सबसिडीवर 120 अब्ज रुपये खर्च करत आहे.