पाकिस्तानमध्ये निवडणुका कशा होतात? पंतप्रधानांची निवड कशी केली जाते? जाणून घ्या सविस्तर...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2023 05:54 PM2023-09-08T17:54:54+5:302023-09-08T18:50:50+5:30
Pakistan General Election : पाकिस्तानच्या राज्यघटनेनुसार निवडणूक आयोग आता ९० दिवसांच्या आत देशात सार्वत्रिक निवडणुका घेण्यास बांधील आहे.
पाकिस्तानमध्ये निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानमध्ये निवडणूक प्रक्रिया काय आहे? तेथे पंतप्रधानांची निवड कशी केली जाते? तसेच पाकिस्तानची निवडणूक प्रक्रिया किती वेगळी आहे? याबद्दल जाणून घ्या. दरम्यान, सध्या पाकिस्तानात काळजीवाहू सरकार आहे. याचे कारण पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी नुकतीच नॅशनल असेंब्ली विसर्जित केली आहे. पाकिस्तानच्या राज्यघटनेनुसार निवडणूक आयोग आता 90 दिवसांच्या आत देशात सार्वत्रिक निवडणुका घेण्यास बांधील आहे.
शाहबाज सरकार गेल्यानंतर काळजीवाहू सरकार स्थापन झाले. पाकिस्तानच्या राज्यघटनेच्या कलम 52 नुसार सरकारची पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर नॅशनल असेंब्ली विसर्जित करणे आवश्यक आहे. आता ज्याप्रमाणे भारतात लोकसभेच्या सदस्यांसाठी निवडणुका घेतल्या जातात, त्याचप्रमाणे पाकिस्तानमध्ये नॅशनल असेंब्लीच्या सदस्यांसाठी निवडणुका घेतल्या जातात. नॅशनल असेंब्लीमध्ये सध्या 342 जागा आहेत, त्यापैकी 243 जागांवर निवडणुका होत आहेत आणि उर्वरित 70 जागा महिला आणि अल्पसंख्याकांसाठी राखीव आहेत. 10 जागा पाकिस्तानातील पारंपारिक आणि धार्मिक अल्पसंख्याक समुदायासाठी आहेत.
पाकिस्तानच्या राज्यघटनेनुसार तेथील संसदेला मजलिस-ए-शुरा आणि कनिष्ठ सभागृह म्हणजेच राष्ट्रीय असेंब्लीला कौमी असेंब्ली म्हणतात. वरच्या सभागृहाला म्हणजेच सिनेटला आयवान-ए बाला म्हणतात. आजही पाकिस्तानमध्ये बॅलेट पेपरद्वारे मतदान केले जाते. राष्ट्रपतींची निवड इलेक्टोरल कॉलेजद्वारे केली जाते. सिनेटचा कार्यकाळ 6 वर्षांचा असतो आणि दर तीन वर्षांनी त्याच्या सदस्यांसाठी निवडणुका होतात. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे सिनेटचे प्रमुख असतात. त्याचा कार्यकाळ 5 वर्षांचा आहे.
या निवडणुकीद्वारे राष्ट्रपती, पंतप्रधान आणि विरोधी पक्षनेते यांची निवड केली जाते. दुसरी गोष्ट म्हणजे पाकिस्तानी राज्यघटनेनुसार पाकिस्तान हा धर्मनिरपेक्ष देश नसून इस्लामिक देश आहे. त्यामुळे इस्लाम धर्माला मानणारा व्यक्तीच पाकिस्तानमध्ये पंतप्रधान होऊ शकतो. दरम्यान, प्रत्येक देशात असे घडते की, कोणत्याही सरकारमध्ये अनेक धोरणे कमी-अधिक प्रमाणात सारखीच असतात. पाकिस्तानचे परराष्ट्र धोरण, विशेषत: अमेरिका, चीन आणि अफगाणिस्तानसोबतचे धोरणात्मक संबंध आहेत, तर भारतासोबतचे संबंध तणावपूर्ण आहेत. तेथील सत्ता मुख्यत्वे सैन्याच्या हातात आहे.