काश्मिरसाठी पाकिस्तानने दहशतवाद पोसला!

By admin | Published: October 28, 2015 10:14 PM2015-10-28T22:14:21+5:302015-10-28T22:14:21+5:30

काश्मिरमध्ये बंडखोरी करण्यासाठी १९९०च्या दशकात पाकिस्तानने लष्कर-ए-तैयबासारख्या संघटनांना पाठिंबा व प्रशिक्षण दिले, अशी स्पष्ट कबुली पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष जनरल परवेज मुशर्रफ यांनी दिली आहे

Pakistan gets terrorism for Kashmir! | काश्मिरसाठी पाकिस्तानने दहशतवाद पोसला!

काश्मिरसाठी पाकिस्तानने दहशतवाद पोसला!

Next

लाहोर : काश्मिरमध्ये बंडखोरी करण्यासाठी १९९०च्या दशकात पाकिस्तानने लष्कर-ए-तैयबासारख्या संघटनांना पाठिंबा व प्रशिक्षण दिले, अशी स्पष्ट कबुली पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष जनरल परवेज मुशर्रफ यांनी दिली आहे.
‘दुनिया न्यूज’ या येथील वृत्तपत्रास दिलेल्या मुलाखतीत मुशर्रफ म्हणाले, ‘ १९९० च्या दशकात काश्मिरमध्ये स्वातंत्र्यलढ्यास सुरुवात झाली. त्यावेळी लष्कर-ए-तैयबा व ११ किंवा १२ अन्य संघटना स्थापन झाल्या. ते काश्मिरमध्ये जीवाची बाजी लावून लढत होते त्यामुळे आम्ही त्यांना पाठिंबा व प्रशिक्षण दिले.’
लष्करचे हाफिज सईद व झकीऊर रेहमान लख्वी यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासंबंधीच्या प्रश्नावर मुशर्रफ उत्तर देत होते.
मुशर्रफ म्हणाले, ‘सईद व लख्वी यांच्यासारखे काश्मिरी स्वातंत्र्यसेनानी त्यावेळी आमचे ‘हीरो’ होते. नंतर, धर्मावर आधारित बंडखोरीने दहशतवादाचे स्वरूप धारण केले. आता ते (पाकिस्तानातील बंडखोर) येथे स्वत:च्याच लोकांचे मुडदे पाडत आहेत. त्यांना आवर घालून थांबवायला हवे.’ मग सईद आणि लख्वी यांनाही असाच आवर घालायला हवा का, असा प्रश्न विचारला असता जनरल मुशर्रफ यांनी त्यावर कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला. (वृत्तसंस्था)
१९७९मध्ये पाकिस्तान धार्मिक बंडखोरीच्या बाजूने होते. धार्मिक बंडखोरीची सुरुवातच पाकिस्तानने केली व त्यातूनच (अफगाणिस्तानात घुसलेल्या) सोविएत फौजांशी दोन हात करण्यासाठी जगभरातून बंडखोर सामिल झाले.
जसे हीरो, तसेच लोक असतील : भारत
नवी दिल्ली : पाक पुरस्कृत दहशतवादाचे समर्थन करणारे आणि हाफीज सईद, लखवी, ओसामा बिन लादेन यांना हिरो ठरविणारे पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष जनरल परवेज मुशर्रफ यांना भारताने सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. जसे यांचे हिरो तसेच लोकही असतील, असा टोला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी लगावला आहे.
भारत तिबेट सीमा पोलीस दलाच्या ५४ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना डोवल यांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली. नागेंद्र स्मृती व्याख्यानमालेत बोलतानाही त्यांनी मुशर्रफांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. अतिरेकी कारवायांत अडकून राहू नका. वेळीच न सुधारल्यास अन्यथा पाक कधीही प्रगती करू शकणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. दक्षिण आशियातील शांततेत भारताची भूमिका हा या व्याख्यानाचा विषय होता. दहशतवादासारखी कृत्ये करणे फायद्याचे असल्याचा पाकचा गैरसमज आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Pakistan gets terrorism for Kashmir!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.