पाकिस्ताननं कुलभूषण जाधवांना दिली फाशीची शिक्षा
By admin | Published: April 10, 2017 03:21 PM2017-04-10T15:21:42+5:302017-04-10T15:53:55+5:30
भारताचे माजी नौसेना अधिकारी कुलभूषण जाधव यांना हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्ताननं मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे.
ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 10 - भारताचे माजी नौसेना अधिकारी कुलभूषण जाधव यांना हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्ताननं मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. पाकिस्तानातल्या रावळपिंडी न्यायालयानं कुलभूषण यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे, असं वृत्त पाकिस्तानी वृत्तपत्र डॉननं दिलं आहे. कुलभूषण जाधवांवर भारतीय गुप्तचर यंत्रणा रॉचे एजंट असल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
जाधव यांना 3 मार्च 2016ला पाकिस्ताननं बलुचिस्तानमधून अटक केली होती. पाकिस्तानी आर्मी अॅक्ट(PAA)अंतर्गत हेरगिरी केल्याचा ठपका ठेवत फील्ड जनरल कोर्ट मार्शल(FGCM)नुसार त्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे, अशी माहिती पाकिस्तानच्या इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स(ISPR)नं दिली आहे. पाकिस्ताननं जाधवांवर विध्वंसक हालचाली केल्याचा ठपका ठेवला आहे. त्यांच्याविरोधात क्वेटाच्या दहशतवाद विरोधी विभागानंही गुन्हा दाखल केला आहे.
पाकिस्तानने रॉ या गुप्तहेर संघटनेचा हस्तक म्हणून जेरबंद केलेल्या कुलभूषण जाधव यांच्या पासपोर्टवर पनवेलचा पत्ता असल्याचे उघड झाले आहे. पनवेलमधील तक्का येथील (जसदानवाला कॉम्प्लेक्स) हायपॉइंट को. हौ. सो.मध्ये तो हुसेन मुबारक या नावाने राहत होते. पनवेलमधील फ्लॅट कुलभूषण यांची आई अवंती जाधव यांच्या नावावर आहे. त्यांचे वडील सुधीर जाधव निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त आहेत.
(कुलभूषणचे पनवेलमध्ये घर
(कुलभूषणला महिन्यापूर्वीच अटक ?)
25 वर्षांपूर्वी त्यांनी पनवेलमध्ये हे घर खरेदी केल्याचे बोलले जात आहे. 12 मे 2014ला ठाणे पासपोर्ट कार्यालयातून बनविण्यात आलेल्या पासपोर्टवर पनवेलचा पत्ता दिला होता. मात्र गेल्या दोन वर्षांपासून कुलभूषण या ठिकाणी आले नव्हते. 2014मध्ये कुलभूषण यांना या ठिकाणच्या स्थानिक रहिवाशांनी पाहिलं होतं. मराठी, हिंदीत संवाद साधणारे कुलभूषण 2010पर्यंत अधूनमधून येत असल्याची माहिती रहिवासी जे. बी. भोईर यांनी दिली. कुलभूषण यांनी एका महिन्यापूर्वी पत्नीशी शेवटचा संपर्क साधला होता, असे कुटुंबीयांनी सांगितले. कुलभूषण हे रॉ संघटनेचे हस्तक असल्याच्या आरोपावरून त्यांना पाकिस्तानात अटक करण्यात आल्याची माहिती मिळताच जाधव कुटुंबीयांनी परराष्ट्र खात्याच्या अधिकाऱ्यांची भेटही घेतली होती. जाधव वास्तव्यात असलेल्या पवईतील हाऊसिंग सोसायटी आणि इमारतीच्या आसपास कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यांच्या इमारतीतील कोणीही त्यांच्या वा कुटुंबाविषयी बोलायला तयार झाले नव्हते. काहींनी तर आम्ही त्या कुटुंबाला ओळखत नसल्याचेच सांगितले होते.
कोण आहेत कुलभूषण जाधव?
पाकिस्तानने रॉ या गुप्तहेर संघटनेचा हस्तक म्हणून जेरबंद केलेल्या कुलभूषण यांनी नौदलातून स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली होती. जाधव यांचा इराणी बंदरावरून माल पाकिस्तानात आणण्याचा व्यवसाय आहे. त्यांना पाकिस्तानने बलुचिस्तान येथून अटक केली आहे. मुंबईतील कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानमध्ये एका महिन्यापूर्वीच अटक करण्यात आली असावी, असा संशय त्याच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, कार्गो व्यवसायात असलेला कुलभूषण इराणला गेला होता. त्यांचा आणि भारताच्या रिसर्च अँड अॅनॅलिसिस विंग (रॉ) या गुप्तचर यंत्रणेशी काडीमात्र संबंध नाही. त्यांनी नौदलातून स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. त्यांचे वडील हे माजी पोलीस सहायक आयुक्त आहेत. कुलभूषण यांनी तीन महिन्यांपूर्वी आपले वडील सुधीर जाधव यांच्याशी संपर्क साधला होता, तर पत्नीशी तो एका महिन्यापूर्वी बोलला होता. त्यानंतर ना त्याचा फोन वा मेल आला, ना त्याच्याशी घरच्यांचा संपर्क झाला. त्यामुळे एका महिन्याच्या काळातच त्याला पाकिस्तान सरकारने अटक केली असावी, असे घरच्यांना वाटत आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, कार्गो व्यवसायात असलेला कुलभूषण इराणमधील बंदर अब्बास आणि छाबहर बंदरांतून मालवाहतूक करीत असे. त्याच्याकडे इराणमध्ये जूनपर्यंत राहण्यासाठी अधिकृत परवाना होता. त्याचा स्वत:च्या व्यापाराखेरीज कशाशीही संबंध नव्हता, असे त्याच्या निकटवर्तीयांनीही सांगितले.