पाकमध्ये मोदींविरोधात ठराव संमत
By admin | Published: August 24, 2016 05:11 AM2016-08-24T05:11:42+5:302016-08-24T05:11:42+5:30
मोदी यांनी गिलगिट आणि बलोचिस्तानविषयी केलेल्या विधानांमुळे त्यांचा निषेध करणारा ठराव पाकिस्तानच्या पंजाब असेंब्लीमध्ये त्यांच्याविरुद्ध ठराव संमत
लाहोर : भारतीय स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गिलगिट आणि बलोचिस्तानविषयी केलेल्या विधानांमुळे त्यांचा निषेध करणारा ठराव पाकिस्तानच्या पंजाब असेंब्लीमध्ये त्यांच्याविरुद्ध ठराव संमत करण्यात आला. मोदी यांनी पाकिस्तानच्या अंतर्गत विषयात हस्तक्षेप केल्याबद्दल पाकिस्तान सरकारने हा मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर उपस्थित करावा, असे या ठरावात नमूद करण्यात आले आहे. पंजाब प्रांताचे कायदामंत्री राणा सनाउल्ला यांनी मांडलेला हा ठराव असेंब्लीमध्ये एकमताने
मंजूर झाला. पंतप्रधान मोदी यांनी गिलगिट आणि बलोचिस्तानविषयक वक्तव्ये करून, पाकच्या अंतर्गत विषयात हस्तक्षेप केला असल्याबद्दल त्यांचा निषेध करण्यात येत आहे, असे म्हटले आहे. तसेच संयुक्त राष्ट्रांसह सर्व आंतरराष्ट्रीय पातळीवर पाक सरकारने हा मुद्दा उपस्थित करावा, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे.
या ठरावावरील चर्चेत सहभागी होताना पाकिस्तान पीपल्स
पार्टीचे सदस्य खुर्रम वट्टू यांनी पाकिस्तानचे भारताशी असलेले व्यापारविषयक संबंध तोडून टाकावेत, अशी मागणी केली, तर विरोधी पक्ष नेते महमदूर रशीद म्हणाले की, मोदी यांचे वक्तव्य म्हणजे भारताच्या असहिष्णू धोरणाचे प्रतीक असून, त्यातून पाकिस्तानमध्ये हस्तक्षेप करण्याचा भारताचा हेतूच स्पष्ट
होतो. (वृत्तसंस्था)
>पाकिस्तानची प्रशंसा केल्यामुळे अभिनेत्रीविरुद्ध देशद्रोहाची तक्रार
बंगळुरू : पाकिस्तान हा नरक नसल्याचे विधान करून अभिनेत्री व काँग्रेस नेत्या रम्या यांनी भारतीय देशभक्तांचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध देशद्रोह आणि इतर आरोपांवरून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करणारी खासगी तक्रार अॅड विठ्ठल गौडा यांनी न्यायालयात दाखल केली आहे. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पाकिस्तानपेक्षा नरक परवडला, अशा आशयाचे विधान मध्यंतरी केले होते.
त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना पाकिस्तानची तुलना नरकाशी करणार नाही. भारतातील लोक आणि पाकमधील लोक एकसारखेच आहेत, असे रम्या यांनी म्हटले होते. मात्र त्यांचे हे विधान म्हणजे देशद्रोह आहे, त्यामुळै त्यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी बंगळुरूमध्ये सुरू केली. सोशल मीडियावरही विरोध आणि समर्थनाचे घमासान युद्ध सुरू झाले. तथापि, रम्या यांनी आपण आपल्या विधानांवर ठाम असल्याचे स्पष्ट केले असून, आपण देशप्रेमी आहोत, आपण कोणताही देशद्रोह केलेला नाही, असे म्हटले आहे. युवा लोकप्रतिनिधींच्या सार्क शिष्टमंडळाच्या सदस्य म्हणून रम्या यांनी अलीकडेच पाकला भेट दिली होती. ‘पाकिस्तान नरक नाही. तेथील लोक आपल्यासारखेच आहेत. त्यांनी आम्हाला चांगली वागणूक दिली, असे रम्या म्हणाल्या होत्या. रम्या यांनी मंड्या लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते.
>देशात आज कोणीही तोंड उघडण्याचा प्रयत्न केला की, त्याच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल होतो. भाजपा अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करण्याचा प्रयत्न करीत आहे. मला माझे विचार आणि मत व्यक्त करण्याचे अधिकार आहेत. भाजपा सरकार हे स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. मी माफी मागणार नाही.
- रम्या, काँग्रेस नेत्या
>काँग्रेसकडून समर्थन
देशात लोकशाही आहे आणि प्रत्येकाला आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे, असे सांगून काँग्रेसने रम्या यांचे समर्थन केले. काँग्रेसचे प्रवक्ते आर.पी.एन. सिंह म्हणाले की, देशद्रोहासारख्या गुन्ह्याचा राजकीय उद्देशांसाठी खुलेआम उपयोग करण्यात येत असून, हे दुर्दैवी आहे.