भारतात सोन्याने गाठला उच्चांक; पाकिस्तानात काय आहेत 1 तोळा सोन्याचे भाव? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 15:56 IST2025-04-22T15:56:33+5:302025-04-22T15:56:42+5:30
Pakistan Gold Price: भारतात सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 1 लाख रुपयांच्या पुढे गेले आहेत.

भारतात सोन्याने गाठला उच्चांक; पाकिस्तानात काय आहेत 1 तोळा सोन्याचे भाव? जाणून घ्या...
Gold Price in Pakistan : सोन्याचे दर 1 लाखांच्या पुढे जाणार, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. आज अखेर तो दिवस उजाडला अन् भारतात सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम(तोळा) 1 लाख रुपयांच्या पुढे गेले. मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नईमध्ये 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत आता प्रति ग्रॅम 10,000 रुपयांपेक्षा जास्त झाली आहे. दरम्यान, भारतात 1 लाखाचा टप्पा ओलांडणाऱ्या सोन्याला पाकिस्तानात काय किंमत आहे, हे जाणून घेऊ.
सोमवारी जीएसटीपूर्वी सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 97,200 रुपयांवर होता, परंतु 3 टक्के जीएसटी जोडल्यानंतर किरकोळ किंमत 1 लाख रुपयांच्या पुढे गेली. याचाच अर्थ आता तुम्हाला दागिने खरेदी करण्यासाठी जास्त पैसे खर्च करावे लागू शकतात.
पाकिस्तानात सोन्याला काय भाव?
रिपोर्ट्सनुसार, 22 एप्रिल रोजी पाकिस्तानमध्ये 24 कॅरेट शुद्ध सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 324940 पाकिस्तानी रुपयांवर पोहोचले आहेत. भारतीय रुपयांप्रमाणे पाकिस्तानातील सोन्याचे दर 98,509 रुपयांवर पोहोचले आहेत.
पाकिस्तानात सोन्याचे भाव का वाढताहेत?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तानमधील सोन्याच्या व्यापाराशी संबंधित लोक आणि विश्लेषकांचा असा विश्वास आहे की, देशातील सोन्याच्या किमती वाढण्याचे मुख्य कारण आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत झालेली वाढ आहे. ही वाढ अमेरिका आणि चीनमधील तीव्र होत चाललेल्या व्यापार युद्धाचा परिणाम असल्याचे मत पाकिस्तानी तज्ञांचे आहे.