पाकिस्तानला 'हवाई' झटका ! सरकारी एअरलाईन्स कंपनी PIA झाली कंगाल, ४८ विमान उड्डाणं रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 03:27 PM2023-10-18T15:27:43+5:302023-10-18T15:30:44+5:30
इंधन तेलासाठी पैसेच नाहीत, आधीचीही बिलं थकली
Pakistan Economic Crisis, PIA : पाकिस्तान हा आशिया खंडातील एक असा देश आहे, जो गेल्या काही महिन्यांपासून दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. गेल्या महिन्यातच पाकिस्तानमध्ये पेट्रोल-डिझेलचे भाव गगनाला भिडले होते. तशातच आता पाकिस्तानला पुन्हा एकदा धक्का बसला आहे. पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स (Pakistan International Airlines) ची विमाने थकीत बिलं न भरल्यामुळे आणि इंधन पुरवठ्यांवरील निर्बंधांमुळे ग्राउंड करण्यात आली आहेत. आधीच तोट्यात चाललेल्या पाकिस्तानच्या सरकारी विमान कंपन्यांना मंगळवारी किमान 24 देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करावी लागल्याची नामुष्की ओढवली.
पाकिस्तानवर आर्थिक संकट अधिकच गडद होत चालले आहे. 24 उड्डाणे रद्द केली गेली. त्यात 24 रद्द उड्डाणांपैकी 11 आंतरराष्ट्रीय आणि 13 देशांतर्गत आहेत. याशिवाय १२ उड्डाणे होण्यासही उशीर झाला. त्यासोबतच पीआयएने बुधवारसाठी दोन डझन उड्डाणेही रद्द केली, त्यापैकी 16 आंतरराष्ट्रीय आणि 8 देशांतर्गत आहेत. त्याचबरोबर अनेक उड्डाणे उशिराने उड्डाण होणार असल्याचीही माहिती आहे. पीआयएच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, दररोज मर्यादित इंधन पुरवठ्यामुळे उड्डाणे रद्द करण्यात आली. ते म्हणाले की जेट इंधनाच्या कमतरतेमुळे मंगळवारी 13 देशांतर्गत उड्डाणे आणि 11 आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्यात आली. तर 12 विमानांना उड्डाणासाठी विलंब झाला.
विमानतळावर येण्यापूर्वी...
रद्द झालेल्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांबद्दल सांगायचे तर ती दुबई, मस्कत, शारजाह, अबुधाबी आणि कुवेतला जाणार होती. पीआयएच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, रद्द झालेल्या फ्लाइटमधील प्रवाशांना पर्यायी फ्लाइटद्वारे त्यांच्या गंतव्यस्थानी पाठवण्यात आले. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, विमान पुढे उड्डाण करणार की नाही हेही ठरवलेले नाही. PIA प्रवक्त्याने सांगितले की, प्रवाशांनी विमानतळावर येण्यापूर्वी PIA कॉल सेंटर आणि त्यांच्या ट्रॅव्हल एजंटशी संपर्क साधावा.
इंधन तेल का उपलब्ध नाही?
पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स अनेक दिवसांपासून इंधन भरत नाही. पाकिस्तानची सरकारी कंपनी पाकिस्तान स्टेट ऑइलने पैसे न भरल्याने हा पुरवठा बंद केला गेला आहे. या परिस्थितीत पाकिस्तानच्या सरकारी विमान कंपन्यांचे भविष्य अंधारात असल्याचे बोलले जात आहे.