कोरोना संकटावर मात करण्यासाठी पाकिस्तान सरकार करतय पंतप्रधान मोदींना फॉलो
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 05:00 PM2020-03-31T17:00:19+5:302020-03-31T17:08:26+5:30
पाकिस्तानचे वृत्तपत्र ‘डॉन’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार पाकिस्तानमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर रेल्वे सेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे.
नवी दिल्ली - पाकिस्तानात दररोज कोरोना व्हायरस बाधितांचा आकडा वाढतच आहे. पाकिस्तानात आतापर्यंत १७१७ लोकांना कोरोनाची लागण झाली असून २१ लोकांचा मृत्यू झाला आहे. यावर मात करण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान अनेक निर्णय घेत आहे. मात्र या निर्णयांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्णयांची झलक दिसत आहे. यामुळे पाकिस्तान सरकार मोदींना फॉलो करतय का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यापैकी ट्रेनमध्ये आयसोलेशन वॉर्ड तयार करण्याचा निर्णय महत्त्वपूर्ण ठरला आहे.
पाकिस्तानचे वृत्तपत्र ‘डॉन’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार पाकिस्तानमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर रेल्वे सेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे. आता एसी कोच आणि बिझनेस क्लास ट्रेनचे रुपांतर आयसोलेश वॉर्डमध्ये करण्याचा निर्णय़ घेण्यात आला आहे. सरकारने या रेल्वेंमध्ये २००० आयसोलेशन बेड बनविण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख रशिद यांनी ही माहिती दिली आहे.
शेख राशिद यांनी सांगितले की, सध्या २२० कोचमध्ये आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात येत आहे. वेळ भासल्यास हे वॉर्ड कुठंही घेऊन जाता येईल, अशा स्वरुपात हे वॉर्ड तयार करण्यात येत आहे. सध्या रावळपिंडी, पेशावर, लाहोर, कराची, क्वेटा, सुक्कर आणि मुल्तानमध्ये याचे काम सुरू करण्यात आले आहे. या सर्व मोबाईल आयसोलेशनमध्ये व्हेंटीलेटरच व्यवस्था करण्यात आली आहे.
याआधीच भारतात कोरोनाशी दोन हात करण्यासाठी भारतीय रेल्वेने पाच हजार डब्ब्यांमध्ये आयसोलेशन सेंटर सुरू करण्याची घोषणा केली आहे. अनेक ठिकाणी याचा वापर सुरू करण्यात आला आहे. रेल्वे कारखान्यात याचे काम करण्यात येत आहे. भारतात १२५ रेल्वे हॉल्पिटल आहेत. यापैकी ७० हून अधिक रुग्णालय अपात्कालिन स्थितीसाठी सज्ज करण्यात आले आहेत. यामध्ये कोरोना रुग्णांसाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे.