पाकिस्तान सरकराचा अजब निर्णय; संसदेत सुरू होणार ब्युटी पार्लर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2020 11:55 AM2020-02-29T11:55:46+5:302020-02-29T11:56:33+5:30
पाकिस्तानच्या संसद परिसरात आता महिला खासदारांसाठी ब्युटी पार्लर सुरु करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
इस्लामाबाद : पाकिस्तानची अर्थव्यवस्था डगमगली असून, बर्याच ठिकाणी लोकांना खाण्यासाठी एक भाकर मिळवणे सुद्धा शक्य होत नाही. मात्र असे असताना सुद्धा तेथील केंद्र सरकार सुधारायला तयार नाही. कारण या सरकारने अशी एक घोषणा केली आहे, ज्यामुळे तेथील लोकांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे.
पाकिस्तानच्या संसद परिसरात आता महिलाखासदारांसाठी ब्युटी पार्लर सुरु करण्याचे आदेश देण्यात आले आहे. संसदेतीलमहिला समितीने संसदीय परिसरात ब्युटी पार्लर सुरू करण्यास सांगितले आहे. आयएनएसने पाकिस्तानी माध्यमांच्या वृत्तानुसार हवाला देताना म्हटलं आहे की, हा मुद्दा महिला खासदारांनी उपस्थित केला होता. त्यांनतर संसद भवन गृहनिर्माण समितीची बैठक झाली. आणि या बैठकीत असा निर्णय घेण्यात आला आहे की, महिला खासदारांसाठी ब्युटी पार्लर सुरू केले जाईल.
इतकेच नव्हे तर महिला खासदारांच्या सूचना असूनही संसद परिसरात निश्चित केलेल्या ठिकाणी ब्युटी पार्लर का उघडले नाही, यासाठी समितीने भांडवल विकास प्राधिकरणास (सीडीए) फटकारले आहे. तर समितीच्या संयोजकांना संसद परिसरात ब्युटी पार्लरसाठी जागा देण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्यामुळे देशात आर्थिक परिस्थिती चांगली नसताना सुद्धा खासदार जनतेचे पैसे ब्युटी पार्लरवर उडवणार असल्याच्या निर्णयावरून तेथील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.