इम्रान खान यांच्या अडचणीत मोठी वाढ! पाकिस्तान सरकारने 'या' यादीत टाकलं नाव
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 06:40 PM2023-05-25T18:40:58+5:302023-05-25T18:42:16+5:30
इम्रान खान यांच्यासह त्यांची पत्नी बुशरा बीबी यांचे नावही यादीत समाविष्ट करण्यात आल आहे
Imran Khan, Pakistan: पाकिस्तान सरकारने माजी पंतप्रधान इम्रान खान आणि बुशरा बीबी यांना देश सोडण्यास बंदी घातली आहे. या दोघांसह पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफच्या इतर 80 सदस्यांची नावेही नो-फ्लाइंग लिस्टमध्ये टाकण्यात आली आहेत. 9 मे रोजी इम्रान खान यांना अटक केल्यानंतर देशात झालेल्या हिंसाचारात या लोकांचा हात असल्याचा आरोप आहे. यातील अनेकांवर पाकिस्तानी लष्करी संस्थांवर हल्ले केल्याचाही आरोप आहे. पाकिस्तानात अघोषित मार्शल लॉ लागू करण्यात आल्याचा दावा खुद्द इम्रान खान यांनी केला आहे.
इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या अनेक प्रांतांमध्ये कलम २४५ लागू करण्यासाठी सरकारविरोधात याचिका दाखल केली असून, याला अघोषित मार्शल लॉ म्हटले आहे. पाकिस्तानच्या राज्यघटनेच्या कलम 245 नुसार, देशाच्या संरक्षणासाठी नागरी प्रशासनाला मदत करण्यासाठी लष्कराला बोलावले जाऊ शकते. पंजाब, खैबर पख्तुनख्वा, बलुचिस्तान आणि इस्लामाबादमधील कलम २४५ च्या अंमलबजावणीला आव्हान देणारी याचिका इम्रान खान यांनी न्यायालयात दाखल केली असून त्याला अघोषित मार्शल लॉ असल्याचे म्हटले आहे.
पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाचे प्रमुख म्हणाले की, लष्कर कायदा, 1952 अंतर्गत नागरिकांची अटक, तपास आणि चाचण्या घटनाबाह्य, अवैध आहेत आणि त्यांचा कोणताही कायदेशीर परिणाम नाही. हे संविधान, कायद्याचे राज्य आणि न्यायपालिकेचे स्वातंत्र्य नाकारण्यासारखे आहे. खान यांनी सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली आहे की त्यांच्या अटकेनंतर 9 मे रोजी झालेल्या हिंसाचाराच्या चौकशीसाठी न्यायिक आयोग स्थापन करण्याचे आदेश द्यावेत, असे वृत्त डॉन वृत्तपत्राने दिले आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, पंतप्रधान शहबाज शरीफ, पीएमएल-एन प्रमुख नवाझ शरीफ आणि त्यांची मुलगी मरियम नवाज, माजी अध्यक्ष आसिफ अली झरदारी, JUI-F प्रमुख मौलाना फजलुर रहमान आणि इतरांना याचिकेत प्रतिवादी करण्यात आले आहे.
दरम्यान, पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी म्हटले आहे की, 9 मे रोजी झालेल्या हिंसाचारात हल्लेखोरांनी पाकिस्तानच्या अभिमानावर हल्ला केला आणि देशाच्या शत्रूंना आनंद साजरा करण्याची संधी दिली. 9 मे चा हिंसाचार या दुःखद घटना आहेत. त्याला हिंसक वळण लागले ही वाईट बाब आहे, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. ज्या लोकांनी हा कट रचला त्यांचा नापाक हेतू होता. लज्जास्पद घटना स्पष्टपणे घडवून आणल्या गेल्या होत्या. संपूर्ण देशाने पाहिले की सत्तेच्या लालसेने त्यांना अशा गोष्टी कशा करायला लावल्या ज्या यापूर्वी कधीही घडल्या नाहीत, असेही ते म्हणाले.