भारतीय कार्यक्रम दाखवला म्हणून पाकमध्ये चॅनेलचा परवाना रद्द
By Admin | Published: November 1, 2016 11:14 AM2016-11-01T11:14:27+5:302016-11-01T11:28:16+5:30
भारतीय हिंदी भाषेत डब केलेले कार्टून दाखवल्याप्रकरणी निकलोडियन चॅनेलचा परवाना रद्द करण्यात आला आहे.
ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 1 - पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया रेग्युलेटॉरी अथॉरिटी म्हणजेच पेमराने निकलोडियन चॅनेलचा परवाना रद्द केला आहे. भारतीय हिंदी भाषेत डब केलेले कार्टून दाखवल्याप्रकरणी निकलोडियन चॅनेलवर ही कारवाई करण्यात आली आहे.
नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पेमराकडून निकलोडियन चॅनेलवर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती सोमवारी देण्यात आली. भारतात पाकिस्तानी कलाकारांना काम करण्यासाठी बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर आता पाकिस्तानातही सर्व भारतीय चॅनेल्सवर बंदी घालण्यात आली होती. तसेच पेमराने सर्व चॅनेल्सना भारताशी संबंधित असलेला मजकूर न प्रसारित न करण्यासंदर्भात नोटीस बजावली होती.
नियम न पाळल्यास संबंधित चॅनेलवर कडक कारवाई करण्यात येईल, असा आदेशही जारी करण्यात आला होता. यानुसारच निकलोडियन चॅनेलवर कारवाई करण्यात आली आहे. उरी दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले आहेत. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. वारंवार दहशतवादी कारवाया करणा-या पाकिस्तानला अद्दल घडवण्यासाठी भारताने पाकिस्तानला सर्व स्तरावर एकटे पाडण्याची भूमिका स्वीकारली आहे. त्याचाच एक भाग म्हणून भारतात पाकिस्तानी कलाकारांच्या काम करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.