हास्यास्पद! फ्रान्समध्ये राजदूत नाही, तरीही पाकिस्तानच्या संसदेत माघारी बोलवण्याचा प्रस्ताव
By हेमंत बावकर | Published: October 27, 2020 10:46 PM2020-10-27T22:46:42+5:302020-10-27T22:47:22+5:30
Pakistan : धक्कादायक म्हणजे पाकिस्तानच्या संसदेत या प्रस्तावावर बहुमताने संमती देण्यात आली. पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक ए इंसाफसह विरोधी पक्षांना एकमुखाने प्रस्तावाला होकार दिला.
इस्लामाबाद : पाकिस्तानने आज पुन्हा एकदा जगभरात आपले हसे करून घेतले आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रो यांनी इस्लामिक दहशतवादावर एक वक्तव्य केले होते. यावरून मुस्लिम राष्ट्रांनी निषेध व्यक्त केला. पाकिस्ताननेही संसदेत निषेध प्रस्ताव मांडला. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी आणखी एक प्रस्तावा देत म्हटले की, फ्रान्समधील पाकिस्तानी राजदूताला माघारी का बोलवू नये.
धक्कादायक म्हणजे पाकिस्तानच्या संसदेत या प्रस्तावावर बहुमताने संमती देण्यात आली. पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक ए इंसाफसह विरोधी पक्षांना एकमुखाने प्रस्तावाला होकार दिला. इथेच त्यांची फजिती झाली. गेल्या तीन महिन्यांपासून पाकिस्तानचा फ्रान्समध्ये कोणीही राजदूत नेमलेला नाही. यावरून परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांना त्यांच्या मंत्रालयाचे किती ज्ञान आहे हे दिसून आले.
तीन महिन्यांपूर्वी पाकिस्तानचे फ्रान्समधील राजदूत मोइन-उल-हक यांनी फ्रान्स सोडले होते. पाकिस्तान सरकारनेच त्यांची बदली करत चीनमधील राजदूत नियुक्त केले होते. तेव्हापासून फ्रान्समध्ये पाकिस्तानचा राजदूत नाही. डॉन वृत्तपत्रानुसार कुरेशी यांना ही बाब माहिती होती. कारण मंत्रीच नियुक्त्यांवर सह्या करतात. मात्र, इस्लामचा मोठा फायदा घेण्याच्या नादात त्यानी संसदेला तिथे आपला राजदूत नसल्याचे सांगितलेच नाही. सध्या मोहम्मद अजिज काझी हे पाकिस्तानच्या पॅरिस येथील दुतावासाचे उप प्रमुख आहेत.
या प्रस्तावानंतर पाकिस्तानने फ्रान्सच्या राजदुतांना माघारी पाठविण्याचे वक्तव्य केले. जर पाकिस्तानने त्यांना माघारी पाठविले तर दोन्ही देशांमध्ये तणाव वाढण्याची शक्यता आहे. सोमवारी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने फ्रान्सच्या राजदुतांना बोलावून मॅक्रो यांच्या वक्तव्याचा विरोध नोंदविला होता.