होय, आम्ही जमात-उद-दावावर कोट्यवधी रुपये खर्च केले; पाकिस्तानची कबुली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2019 02:13 PM2019-09-12T14:13:04+5:302019-09-12T14:15:34+5:30
मंत्र्याच्या विधानानं पाकिस्तानी तोंडावर
इस्लामाबाद: दहशतवादी संघटना जमात-उद-दावावर पाकिस्तान सरकारनं कोट्यवधी रुपये खर्च केल्याची कबुली दिली आहे. विशेष म्हणजे गृहमंत्री इजाज अहमद शहा यांनी राष्ट्रीय वृत्तवाहिनीवरील मुलाखतीत ही खळबळजनक माहिती दिली. जमात-उद-दावाच्या दहशतवाद्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पाकिस्तान सरकारनं कोट्यवधी रुपये खर्च केल्याचं शहा यांनी सांगितलं.
आम्ही जमात-उद-दावावर कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत, असं गृहमंत्री इजाज अहमद शहा यांनी हम न्यूज दिलेल्या मुलाखतीत म्हटलं. 'दहशतवादाच्या मार्गानं गेलेल्या तरुणांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत,' असं ते म्हणाले. फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्सकडून (एफएटीएफ) पाकिस्तानचा समावेश काळ्या यादीत केला जाण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर सहानुभूती मिळवण्यासाठी शहांनी जमात-उद-दावा संदर्भातलं विधान केल्याचं बोललं जात आहे.
याआधी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीदेखील अमेरिकेच्या दौऱ्यादरम्यान पाकिस्तानात दहशतवादी संघटना सक्रीय असल्याची कबुली दिली होती. 'पाकिस्तानात 30 ते 40 हजार दहशतवादी आहेत. या दहशतवाद्यांना पाकिस्तानात प्रशिक्षण दिलं जातं. त्यानंतर ते अफगाणिस्तान, काश्मीरमध्ये सक्रीय होतात', असं खान म्हणाले होते. आधीच्या सरकारांनी दहशतवाद्यांवर कारवाई करण्याची हिंमत दाखवली नव्हती. मात्र आपल्या सरकारनं दहशतवाद्यांवर कठोर कारवाई केल्याचा दावा त्यांनी केला होता.