पाकिस्तानने आत्मपरीक्षण करण्याची वेळ
By admin | Published: January 20, 2016 03:44 PM2016-01-20T15:44:26+5:302016-01-20T15:46:06+5:30
पाकिस्तानी लष्कराने वाढवलेला तालिबानी संघटनेचा ग्रुप आता त्यांच्यावरच उलटला असून बचा खान विदयापीठ हल्ल्यानंतर पाकिस्तानने आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २० - अफगाणिस्तानवर नियंत्रण रहावे यासाठी पाकिस्तानी लष्कराने वाढवलेला तालिबानी संघटनेचा ग्रुप आता त्यांच्यावरच उलटला असून बचा खान विदयापीठ हल्ल्यानंतर पाकिस्तानने आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे, असे मत परराष्ट्र धोरण विश्लेषक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी व्यक्त केले.
त्यांनी मांडलेले मुद्दे खालीलप्रमाणे:
'पाकिस्तानला एक कडवा इस्लामिक देश बनवणे तसेच पाकिस्तानच्या तुरूंगात खितपत पडलेल्या 'तहरीक-ए-तालिबान' या संघटनेतील अनेक दहशतवाद्यांची मुक्तता करणे' या दोन प्रमुख मागण्या करत 'तहरीक-ए-तालिबान' या संघटनेची पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची २००९ पासून चर्चा सुरू आहे. मात्र ती सतत अपयशी ठरत असल्याने ही संघटना व पाकिस्तानमध्ये पुन्हा युद्ध सुरू होतं. आज पेशावरमधील युनिव्हर्सिटीवर झालेल्या या हल्ल्याची जबाबदारीही याच संघटनेने घेतली आहे. यापूर्वी त्यांनी गेल्यावर्षी लष्करी शाळेवर हल्ला करत लष्करी अधिका-यांच्या शेकडो मुलांना निर्घृणपणे ठार मारले होते.
१५ जून २०१५मध्ये नवाज शरीफ यांनी या संघटनेविरोधात एका लष्करी मोहिमेची घोषणा केली. पाकिस्तान - अफगाणिस्तान सीमारेषेला लागून असलेल्या 'फटा' (Federally Administered Tribal Area) या प्रदेशात तहरीक-ए-तालिबान वा धार्मिक मूलतत्ववादी संघटनांचे फार मोठ्या प्रमाणात वास्तव्य असून पाकिस्तानने या क्षेत्रावर लष्करी कारवाई केली. गेल्या वर्षभरात पाकिस्तानचे जवळपास ४० हजार सैन्य या भागात असून त्यांनी ग्राऊंड लेव्हलवर कारवाई करत अनेक अतिरेक्यांना मारले आणि हवाई हल्ल्यांसाठी अमेरिकेची मदत घेतली. अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात तहरिक-ए-तालिबान संघटनेतील अनेक लहान मुले व स्त्रिया मारल्या गेल्या आणि त्याचाच सूड उगवण्यासाठी या संघटनेने गेल्या वर्षी लष्कराच्या शाळेवर आणि आज विद्यापीठावर दहशतवादी हल्ला करत लहान मुलांना, विद्यार्थ्यांना लक्ष्य केले.
पाकिस्तानने लष्करी कारवाई थांबवावी, चर्चा करावी आणि तहरीकच्या अतिरेक्यांना तुरूंगातून सोडावे ही तालिबाची मुख्य मागणी असून ते अशा कारवाया करून पाकिस्तावर दबाव आणत आहेत. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. दहशतवादासंदर्भात पाकिस्तानचे एकंदर धोरण दुटप्पी असून अफगाणिस्तानच्या राजकारणावर आपलं नियंत्रण व प्रभाव रहावा म्हणून पाकिस्तानच्या लष्करानेच हा तालिबानचा ग्रुप वाढवला, मात्र आता तोच त्यांच्यावर उलटला आहे. त्यामुळे पाकिस्तानी जनता, राजकारणी व लष्कराने आता आत्मपरीक्षण करून दहशतवादाविरोधात ठामपणे उभं राहण्याची वेलव आली आहे.
- डॉ. शैलेंद्र देवळाणकर ( परराष्ट्र धोरण विश्लेषक)