पाकिस्तान हा अनेक दहशतवाद्यांचा आश्रयदाता
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2020 04:24 AM2020-11-26T04:24:58+5:302020-11-26T04:25:40+5:30
भारताने दस्तावेजाचे काढले वाभाडे
संयुक्त राष्ट्र : पाकिस्तान संयुक्त राष्ट्राद्वारे घोषित केलेल्या अनेक दहशतवाद्यांचा आश्रयदाता आहे. अबोटाबादेत अनेक वर्षे अल-कायदाचा कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेन दडी मारून बसला होता, नंतर तो मारला गेला, याची आठवणही भारतानेपाकिस्तानला करून दिली.
संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस ॲन्टॉनिओ गुटेरस यांनी संयुक्त राष्ट्रातील पाकिस्तानच्या दूताने सादर केलेल्या माहितीदाखल दस्तावेजावरून भारताने पाकिस्तानचे वाभाडे काढले.
संयुक्त राष्ट्रातील भारताचे कायमस्वरूपी प्रतिनिधी टी. एस. तिरुमूर्ती यांनी मंगळवारी केलेल्या ट्वीटमध्ये पाकिस्तानने सादर केलेले दस्तावेज विश्वासार्ह नाहीत, खोटेनाटे दस्तावेज गोळा करून खोटे कथानक रचण्याचे पाकिस्तानचे खटाटोप काही नवीन नाहीत. संयुक्त राष्ट्राने घोषित केलेल्या अनेक दहशतवाद्यांचा पाकिस्तान आश्रयदाता आहे. पाकिस्तानने अबोटाबाद आठवावे. संयुक्त राष्ट्रातील पाकिस्तानचे राजनैतिक प्रतिनिधी मुनीर अक्रम यांनी गुटेरस यांची भेट घेऊन पाकिस्तान सरकारच्या वतीने एक दस्तावेज सादर केला होता. भारत पाकिस्तानात दहशवादाला उत्तेजन देत आहे, असा आरोप यात करण्यात आला होता. यावर परखड प्रतिक्रिया देत तिरुमूर्ती यांनी पाकिस्तानला अबोटाबादची आठवण करून दिली. अबोटाबादेत ओसामा बिन लादेन अनेक वर्षे दडी मारून बसला होता.
मे २०११ मध्ये अमेरिकी नौदलाच्या सील कमांडोजनी त्याला ठार केले होते.
पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या जम्मू-काश्मीरमधील नगरोटामध्ये सुरक्षा दलावर हल्ला करण्याच्या कटाबाबत सोमवारी भारताचे विदेश सचिव हर्षवर्धन शृंगला यांनी अमेरिका, रशिया, फ्रान्स आणि जपानच्या दूतांना माहिती दिली होती.