अफगाणिस्तानबाबत अजित डोवाल इन ॲक्शन! पाकिस्तानची उडाली झोप; बोलावली तातडीची बैठक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 02:58 PM2021-11-10T14:58:43+5:302021-11-10T14:59:38+5:30

अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा केल्यानंतर भारतात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय पातळीवर एका संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

pakistan to host america china and russia meeting on afghanistan a day after india holds nsa talks | अफगाणिस्तानबाबत अजित डोवाल इन ॲक्शन! पाकिस्तानची उडाली झोप; बोलावली तातडीची बैठक

अफगाणिस्तानबाबत अजित डोवाल इन ॲक्शन! पाकिस्तानची उडाली झोप; बोलावली तातडीची बैठक

googlenewsNext

इस्लामाबाद:तालिबाननेअफगाणिस्तानवर ताबा मिळवत सत्ता स्थापन केली. मात्र, आता या तालिबान सरकारला मान्यता द्यावी का, याबाबत जागतिक स्तरावरील देश अद्याप कोणताच निर्णय घेताना दिसत नाही. मात्र, यातच आता अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर भारताने एनएसए स्तरावरील बैठकीचे आयोजन केले आहे. यानंतर आता पाकिस्ताननेही एक बैठक बोलावली आहे. यामध्ये अमेरिका, चीन आणि रशियाचे वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहे. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी या बैठकीचे नेतृत्व करणार आहेत. 

अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा केल्यानंतर भारतात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय पातळीवर एका संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यात अनेक देशांच्या प्रतिनिधींचा समावेश असण्याची शक्यता आहे. अफगाणिस्तानातील परिस्थितीवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पातळीवर या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीचे सर्व देशांना निमंत्रण देण्यात आले आहे. परंतु या बैठकीत निमंत्रण मिळूनही पाकिस्तानपाठोपाठ आता चीननेही सहभाग घेण्यास नकार दिला आहे. यानंतर आता पाकिस्ताननेही अशाच बैठकीचे आयोजन केले आहे. 

चीन, अमेरिका आणि रशियाचे अधिकारी होणार सहभागी

पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनने दिलेल्या माहितीनुसार, रशिया, अमेरिका, चीन आणि पाकिस्तानचे प्रतिनिधी अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री आमिर खान मुत्ताकी यांची भेट घेणार आहेत. रिपोर्टनुसार, मुत्ताकी इस्लामाबाद दौऱ्यावर आहेत. भारताने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पातळीवरील बैठकीचे आयोजन केले असतानाच पाकिस्तानमध्ये होत असलेली बैठक महत्त्वाची मानली जात आहे. वास्तविक पाहता पाकिस्तानकडून तालिबान सरकारला मान्यता देण्यात आलेली नाही. मात्र, असे असले तरी जागतिक स्तरावरील देशांनी तालिबान सरकारला मान्यता द्यावी, यासाठी पाकिस्तान शक्य तेवढे सगळे प्रयत्न करताना दिसत आहे. रशिया आणि अमेरिका तालिबान सरकारला इतक्यात मान्यता देतील, असे चित्र नसल्याचे सांगितले जात आहे. 

दरम्यान, भारताने आयोजित केलेल्या अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा परिस्थितीवरील चर्चेत चीन सहभागी होणार नाही. या बैठकीची वेळ नियोजित कार्यक्रमात बसत नसल्याचं कारण चीनने दिले आहे. या संमेलनात इराण, रशिया, उज्बेकिस्तान, कजाकिस्तान, तुर्केमेनिस्तान, ताजिकिस्तान आणि किर्गिस्तानचे प्रतिनिधी सहभागी होतील, असे सांगितले जात आहे.
 

Web Title: pakistan to host america china and russia meeting on afghanistan a day after india holds nsa talks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.