पाकिस्तानने हिंदुंना पुन्हा दुखावलं! मॉल बनवण्यासाठी १५० वर्ष जुनं मंदिर केलं जमीनदोस्त!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2023 11:35 PM2023-07-16T23:35:30+5:302023-07-16T23:36:06+5:30
400 ते 500 स्क्वेअर यार्डमध्ये पसरले होते मंदिर
Hindu Temple Demolition in Pakistan: पाकिस्तानमध्ये वास्तव्यास असलेल्या हिंदू जनतेवर अन्याय होत असल्याच्या बातम्या सातत्याने वाचायला मिळतात. पुन्हा एकदा पाकिस्तान सरकारने हिंदूंच्या भावना दुखावण्याचे काम केले. पाकिस्तानच्या सिंध प्रांताची राजधानी कराची येथे एक 150 वर्षे जुने हिंदू मंदिर पाडण्यात आले असून, या मंदिराला जुने आणि धोकादायक वास्तू म्हटले आहे. मंदिर पाडल्यानंतर या परिसरात राहणाऱ्या हिंदू समाजातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कराचीच्या सोल्जर बझारमध्ये असलेले मारी माता मंदिर शुक्रवारी रात्री उशिरा पोलिसांच्या उपस्थितीत बुलडोझरच्या सहाय्याने पाडण्यात आले. या भागातील हिंदू मंदिरांचे काळजीवाहक रामनाथ मिश्रा महाराज म्हणाले की, अधिकाऱ्यांनी रात्री उशिरा मंदिर पाडले आणि हे घडणार आहे याची आम्हाला कल्पनाही दिलेली नव्हती.
मंदिर 400 ते 500 स्क्वेअर यार्डमध्ये पसरले होते
रामनाथ मिश्रा महाराज म्हणाले की, अधिकाऱ्यांनी मंदिराच्या बाहेरील भिंती आणि मुख्य दरवाजा कायम ठेवला असला तरी आतील संपूर्ण वास्तू पाडली. सुमारे दीडशे वर्षांपूर्वी हे मंदिर बांधण्यात आले असून, असे सांगितले जाते की मंदिराच्या प्रांगणात खजिना पुरल्याची शक्यता आहे. 400 ते 500 स्क्वेअर यार्ड परिसरात हे मंदिर बांधण्यात आले असून, मंदिराची जमीन बळकावण्याचे अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिक पोलीस ठाण्यातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मंदिराला अधिकाऱ्यांनी धोकादायक वास्तू म्हणून घोषित केल्यामुळे ते पाडण्यात आले.
मंदिर मद्रासी हिंदू समुदाय चालवत होते
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मंदिर कराचीच्या मद्रासी हिंदू समुदायाद्वारे चालवले जात होते आणि त्यांनी मान्य केले की ही रचना खूप जुनी आणि धोकादायक आहे. मंदिर व्यवस्थापनाने जड अंतःकरणाने देवतांच्या मूर्ती एका छोट्या खोलीत हलवल्या, असे अधिकाऱ्याने सांगितले.
स्थानिक नेत्याचे विधान
हिंदू समुदायाचे स्थानिक नेते रमेश म्हणाले की, मंदिराची जमीन बनावट कागदपत्रांच्या आधारे विकसकाला विकण्यात आल्याने मंदिर व्यवस्थापनावर काही काळासाठी जागा रिकामी करण्याचा दबाव होता. विकासकाला मंदिराच्या जमिनीवर व्यावसायिक मॉल बांधायचा आहे. हिंदू समुदायाने पाकिस्तान-हिंदू परिषद, सिंधचे मुख्यमंत्री सय्यद मुराद अली शाह आणि सिंध पोलिस महानिरीक्षक यांना या प्रकरणाची तातडीने दखल घेण्याचे आवाहन केले आहे. पाकिस्तानातील बहुतांश हिंदू लोकसंख्या सिंध प्रांतात स्थायिक आहे. हिंदू हा येथील सर्वात मोठा अल्पसंख्याक समुदाय आहे.