दणका ! दहशतवादावर कारवाई न करणाऱ्या पाकिस्तानची अमेरिकेकडून आर्थिक नाकेबंदी, 2100 कोटींची मदत रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2018 09:03 AM2018-09-02T09:03:47+5:302018-09-02T10:46:35+5:30
गेल्या काही दिवसांपासून दहशतवादाच्या मुद्यावरुन अमेरिका-पाकिस्तानमध्ये संघर्ष सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आता अमेरिकेतील ट्रम्प सरकारनं पाकिस्तानची आर्थिक नाकेबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे.
न्यू यॉर्क - पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान आणि अमेरिकेमध्ये काही मुद्यांवरुन वादावादी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून दहशतवादाच्या मुद्यावरुन दोन्ही देशांमध्ये संघर्ष सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आता अमेरिकेतील ट्रम्प सरकारनं पाकिस्तानची आर्थिक नाकेबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. वारंवार सूचना करुन देखील दहशतवादाविरोधात कारवाई न करणाऱ्या पाकिस्तानला अमेरिकेनं धडा शिकवला आहे. पाकिस्तानला देण्यात येणारी 300 दशलक्ष डॉलर्सची आर्थिक मदत अमेरिकेकडून रोखण्यात आली आहे. यावरुन अमेरिकेनं कुरापती पाकिस्तानला जोर का झटका जोरोसे दिल्याचं दिसत आहे.
याबाबत अमेरिकी सैन्याकडून सांगण्यात आले आहे की, ''पाकिस्तानला देण्यात येणारी 300 दक्षलक्ष डॉलर्स म्हणजे जवळपास 2100 कोटी रुपयांची आर्थिक मदत रोखण्यात आली आहे. दहशतवादी संघटनांविरोधात कारवाई करण्यास पाकिस्तान अपयशी ठरले आहे. वारंवार सूचना करुनही दहशतवादाविरोधात ठोस कारवाई न केल्यामुळे 300 दशलक्ष डॉलर्सची आर्थिक मदत रोखण्याचा निर्णय घेण्यात आला आहे''.
एका फोन कॉलवरुन वादास प्रारंभ
अमेरिका आणि पाकिस्तानमधील नवनिर्वाचित इमरान सरकारमध्ये एका फोन कॉलवरुन वाद सुरू झाल्याचं म्हटले जात आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्यासोबत फोनवरुन संवाद साधला होता. यावेळी त्यांनी पाकिस्तानातील सर्व दहशतवादी संघटनांविरोधात ठोस कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र, अमेरिकेकडून करण्यात आलेल्या दहशतवादासंदर्भातील आरोपांचं पाकिस्ताननं खंडण केले. यानंतर दोन्ही देशांमध्ये शाब्दिक संघर्ष सुरू झाल्याचे म्हटले जाते आहे.
दरम्यान, कालच पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान अमेरिकेच्या एकतर्फी मागण्या पाकिस्तान मान्य करणार नाही, असे जाहीररित्या म्हटले होते. तसेच पाकिस्तानच्या राष्ट्रीय हिताला बाधक ठरणारे सर्व करार रद्द केले जातील, असा इशाराही खान यांनी दिला होता. पाकिस्तानला अमेरिकेशी सन्मानपूर्वक संबंध ठेवायचे आहेत. तसेच भारत, अफगाणिस्तान आणि इराणबरोबरही शांततापूर्ण संबंध ठेवायचे आहेत. मात्र अमेरिकेच्या एकतर्फी मागण्या पाकिस्तान मान्य करणार नाही, असे त्यांनी म्हटले होते.
The U.S. military said it has made a final decision to cancel $300 million in aid to Pakistan that had been suspended over Islamabad's perceived failure to take decisive action against militants, in a new blow to deteriorating ties: Reuters pic.twitter.com/HsnUfFjQHf
— ANI (@ANI) September 2, 2018