Pakistan Political Crisis: '68 लाखांची बॅग अन् 600 कोटींचा घोटाळा', कोण आहे इम्रान खान यांच्या जवळची 'ती' महिला?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2022 06:15 PM2022-04-06T18:15:01+5:302022-04-06T18:15:11+5:30
Pakistan Political Crisis: पाकिस्तानमध्ये मोठा राजकीय गोंधळ पाहायला मिळत आहे. आधी इम्रान खान यांना सत्तेतून पायउतार व्हावे लागले आहे, त्यानंतर त्यांच्या निकटवर्तीयावर मोठा आरोप लावला जात आहे.
इस्लामाबाद:पाकिस्तानमध्ये मोठा राजकीय गोंधळ झालेला पाहायला मिळत आहे. इम्रान खान यांना सत्तेतून पायउतार व्हावे लागले आहे. त्यानंतर आता त्यांची निकटवर्ती असलेल्या फराह खानवर कोट्यवधी रुपयाच्या घोटाळ्याचे गंभीर आरोप लागले आहेत. तसेच, पैसे घेऊन ती पाकिस्तानातून पळून गेल्याचा दावाही केला जात आहे. ती खासगी विमानाने पळून जात असल्याचा एक फोटोही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
68 लाखांची बॅग घेऊन पसार?
फराह खान पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान इम्रान खान यांची पत्नी बुशरा बीबी यांची अत्यंत जवळची मैत्रीण आहे. सत्तेच्या अतिशय जवळ असल्याने फराहवर 600 कोटींची हेराफेरी केल्याचा आरोप आहे. यातच ती पाकिस्तानातून काही पैसे घेऊन पळून गेल्याचा दावा केला जात आहे. तिचा एका लक्झरी विमानात बसल्याचा फोटोही व्हायरल होत आहे. यामध्ये तिच्याजवळ एक मौल्यवान बॅग दिसत आहे, ज्याची किंमत सुमारे 68 लाख रुपये असल्याचा दावा केला जात आहे.
Farah Khan, Bushra’s Frontwoman who ran away . The bag with her is for $90,000. Yes that’s ninety thousand dollars. pic.twitter.com/ESrZOKD3h6
— Romina Khurshid Alam (@MNARomina) April 5, 2022
पाकिस्तानी वृत्तपत्र द डॉनच्या रिपोर्टनुसार, फराह खान रविवारीच दुबईला पळून गेली आहे. तिचा नवरा आधीच परदेशात निघून गेल्याचे बोलले जात आहे. या सगळ्यामध्ये पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाजच्या विरोधी पक्षाच्या नेत्या रोमिना खुर्शीद यांनी फराहचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो कधी काढण्यात आला, हे स्पष्ट झाले नसले तरी. फोटोमध्ये फराहच्या शेजारी एक बॅग दिसत आहे. याबद्दल रोमिना खुर्शीद यांनी लिहिले- 'बुशराची जवळची मैत्रीण फराह खान देशातून पळून गेली आहे. तिच्याजवळ सुमारे 68 लाखांची बॅग आहे.'
फराहवर काय आरोप आहे?
पीएमएल-एन पक्षाच्या उपाध्यक्षा मरियम नवाज यांनी फराहवर अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पोस्टिंगच्या बदल्यात मोठ्या प्रमाणात पैसे उकळल्याचा आरोप केला होता. मरियमने फराहवर 600 कोटींची हेराफेरी केल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, आज इम्रान सरकारमधील मंत्री फवाद चौधरी यांनी पत्रकार परिषदेत फराह खानबाबत प्रश्न विचारण्यात आल्यावर ते पत्रकारांवर चांगलेच भडकेले पाहायला मिळाले. यावेळी त्यांनी पत्रकारांना भाडोत्री असा उल्लेख केला.