Pakistan: गुलजार अहमद होणार पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान?; इम्रान खान यांनीच केली नियुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2022 06:44 PM2022-04-04T18:44:02+5:302022-04-04T19:12:50+5:30
Pakistan: माजी सरन्यायाधीश गुलजार अहमद पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
इस्लामाबाद:इम्रान खान (Imran Khan) यांनी पाकिस्तानचे माजी सरन्यायाधीश गुलजार अहमद (Gulzar Ahmed) यांची काळजीवाहू पंतप्रधान म्हणून नियुक्ती केल्याची माहिती समोर आली आहे. पीटीआयचे नेते फवाद चौधरी यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली. पीटीआय नेते फवाद चौधरी यांनी ट्विट केले की, "तेहरीक-ए-इन्साफ कोअर कमिटीशी सल्लामसलत आणि मंजुरीनंतर पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानचे माजी सरन्यायाधीश गुलजार अहमद यांची काळजीवाहू पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली आहे."
याआधी पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी पंतप्रधान इम्रान खान आणि संसदेतील विरोधी पक्षनेते शाहबाज शरीफ यांना पत्र लिहून कलम 224-ए(1) अंतर्गत काळजीवाहू पंतप्रधानांच्या नावाचा प्रस्ताव देण्यास सांगितले होते. पंतप्रधानांच्या काळजीवाहूची नियुक्ती होईपर्यंत इम्रान खान पंतप्रधानपदाची जबाबदारी पार पाडत राहतील, असे राष्ट्रपतींनी आपल्या पत्रात म्हटले होते. दरम्यान, गुलजार अहमद यांच्या आधी इम्रान खान यांनी काळजीवाहू पंतप्रधानपदासाठी दोन नावे राष्ट्रपतींकडे पाठवली होती. त्यात निवृत्त न्यायमूर्ती अजमत सईद आणि निवृत्त लेफ्टनंट जनरल हारुन अस्लम यांची नावे आहेत, तर पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाझ) नेते शाहबाज शरीफ यांनी अध्यक्षांचे नाव देण्यास नकार दिला.
कोण आहेत गुलजार अहमद?
2 फेब्रुवारी 1957 रोजी कराची येथे जन्मलेले माजी न्यायमूर्ती गुलजार अहमद हे पाकिस्तानचे 27वे सरन्यायाधीश होते. 21 डिसेंबर 2019 रोजी त्यांनी पाकिस्तानचे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. गुलजार अहमद यांनी फेब्रुवारी 2022 पर्यंत पाकिस्तानचे सरन्यायाधीश म्हणून काम पाहिले. गुलजार अहमद यांना इम्रान खान यांनी संमती दर्शवल्यानंतर त्यांची काळजीवाहू पंतप्रधानपदी नियुक्ती करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
पाकिस्तानात राजकीय संकट
पाकिस्तानच्या 342 सदस्यीय नॅशनल असेंब्लीमध्ये इम्रान खान यांना बहुमतासाठी 172 जागांची गरज होती. विरोधकांचा दावा आहे की त्यांना 174 खासदारांचा पाठिंबा आहे. म्हणजेच इम्रान खान यांनी सभागृहातील बहुमत गमावले आहे. विरोधी पक्षांनी सभागृहात अविश्वास ठरावावर मतदानाची मागणी केली होती. मात्र नॅशनल असेंब्लीचे डेप्युटी स्पीकर कासिम सूरी यांनी पंतप्रधानांविरुद्धचा अविश्वास प्रस्ताव फेटाळला. आता याप्रकरणी विरोधी पक्ष सुप्रीम कोर्टात गेले असून, तिथे मंगळवारी निर्णय अपेक्षित आहे. विरोधी पक्षांच्या बाजूने निर्णय न आल्यास देशात निवडणुका होतील.