"पाकिस्तानमध्ये भारताचा विरोध करणं हीच आमची रोजी-रोटी"
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2020 02:52 PM2020-11-11T14:52:52+5:302020-11-11T15:03:00+5:30
India And Pakistan : इम्रान खान यांच्या जवळच्या नेत्यांपैकी एक असणाऱ्या फिरदौस आशिक अवान यांनी पाकिस्तानमध्ये भारताविरोधी भावनांवर केलेल्या भाष्याला सर्वाधिक प्रतिसाद मिळतो असं म्हटलं आहे.
इस्लामाबाद - पाकिस्तानमधील नेत्यांचं राजकारण हे भारताला विरोध करण्याच्या अवतीभोवतीच फिरत असल्याचं आता पाकिस्तानमधील मंत्र्यांनीच कबूल केलं आहे. इम्रान खान यांच्या जवळच्या नेत्यांपैकी एक असणाऱ्या फिरदौस आशिक अवान (Firdous Ashiq Awan) यांनी पाकिस्तानमध्ये भारताविरोधी भावनांवर केलेल्या भाष्याला सर्वाधिक प्रतिसाद मिळतो असं म्हटलं आहे. "पाकिस्तानमध्ये भारताचा विरोध करणं हीच आमची रोजी-रोटी" असं अवान यांनी म्हटलं आहे.
"भारताला विरोध करण्यावरच आमची रोजी-रोटी आहे. त्यामुळेच सर्वच राजकीय नेते या मुद्द्यांबद्दल जास्त बोलत असतात" असं फिरदौस आशिक अवान यांनी म्हटलं आहे. पाकिस्तानमधील पंजाब प्रांताच्या माहिती आणि संस्कृती विषयाच्या विशेष सहाय्यक असणाऱ्या अवान या पाकिस्तानमधील एआरव्हाय न्यूजवरील एका चर्चेमध्ये सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी असं म्हटलं आहे.
Anti-India sentiment chooran sells like nothing else in Pakistan. Jo chalta hai wo bikta hai. pic.twitter.com/7MddGi91yA
— Naila Inayat नायला इनायत (@nailainayat) November 10, 2020
"भारताविरोधी भावनांसंदर्भातील विधानं जास्त विकली जातात आणि चर्चेत असतात"
"आपल्याकडील राजकारण्यांनी गद्दारी, भारत, मोदींसारख्या विषयांबद्दलची विधानं करणं हे आता अगदी सामान्य झालं आहे असं तुम्हाला नाही का वाटतं? असा प्रश्न त्यांना चर्चेदरम्यान विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना अवान यांनी "आपल्या देशामध्ये भारताविरोधी भावनांसंदर्भातील विधानं जास्त विकली जातात आणि चर्चेत असतात. जे सर्वाधिक चर्चेत असतं विकलं जातं. फक्त सरकारच नाही तर सर्वच लोकं हे करतात" असं म्हटलं आहे.
अवान या इम्रान खान यांच्या मुव्हमेंट फॉर चेंज मोहिमेत होत्या सक्रिय
विरोधी पक्षाने तर मोदींच्या नावाखाली तर अशा गोष्टी विकल्या आहेत की त्या ऐकून हसू येईल असं देखील अवान यांनी म्हटलं आहे. पीटीआयचं सरकार सत्तेत येण्याआधी अवान या इम्रान खान यांच्या मुव्हमेंट फॉर चेंज मोहिमेत सक्रिय होत्या. याच मोहिमेदरम्यान इम्रान आणि त्यांच्या समर्थकांनी इस्लामाबादमध्ये महिनाभर आंदोलन केलं होतं. अवान या पाकिस्तान पिपल्स पार्टीच्या सरकारमध्ये मंत्रीही होत्या. एप्रिल 2019 मध्ये इम्रान खान यांनी अवान यांना आपल्या मंत्रीमंडळामध्ये सूचना आणि माहिती प्रसारण मंत्रालयामध्ये विशेष अधिकारी म्हणून नियुक्त केलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिलं आहे.