Pakistan: राष्ट्रपतींकडून संसद बरखास्त पण त्यावर विरोधकांचा 'ताबा', पाकिस्तानात नेमकं काय घडतंय?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2022 03:46 PM2022-04-03T15:46:43+5:302022-04-03T15:49:45+5:30
Pakistan: पाकिस्तानच्या स्थापनेपासून आजपर्यंत एकदाही कोणत्या पंतप्रधानाला आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही.
इस्लामाबाद: भारतासह अनेक देश रविवारी वीकेंडची सुट्टी साजरी करत आहेत, तर तिकडे पाकिस्तानच्या राजकारणात अभूतपूर्व खळबळ उडाली आहे. विरोधक इम्रान खान यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडण्याच्या तयारीत होते, पण नॅशनल असेंब्लीमध्ये इम्रान खान आलेच नाहीत. यादरम्यान, उपसभापती कासिम सूरी यांनी पंतप्रधान इम्रान यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्ताव फेटाळला. त्यानंतर इम्रान खान देशाला संबोधित करण्यासाठी टीव्हीवर आले आणि त्यांनी राष्ट्रपतींकडे नॅशनल असेंब्ली बरखास्त करून देशात पुन्हा निवडणुका घ्याव्यात, अशी शिफारस केली. इम्रान खान यांच्या शिफारसीनंतर अर्ध्या तासात राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी संसद बरखास्त केली.
इम्रान खान यांची इनिंग संपुष्टात
अशाप्रकारे पाकिस्तानमध्ये गेले अनेक आठवडे सुरू असलेला राजकीय गोंधळ अशा टप्प्यावर आला आहे की, जिथून पाकिस्तानला पुन्हा एकदा निवडणुकीच्या दिशेने जावे लागले आहे. इम्रान खान यांना अविश्वास प्रस्तावाला सामोरे जावे लागले नसले तरी पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून त्यांची इनिंग संपुष्टात आली आहे. त्यामुळे पाकिस्तानातील कोणताही पंतप्रधान आपला कार्यकाळ पूर्ण करू शकत नाही, हा विश्वास पुन्हा एकदा पक्का झाला आहे.
विरोधकांचा संसदेवर ताबा
राष्ट्रपतींनी इम्रानची शिफारस मान्य करुन संसद बरखास्त केली आणि इम्रान यांची काळजीवाहू पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली. दुसरीकडे, विरोधी खासदार सदन सोडण्यास तयार नाहीत, त्यांनी आपला सभापती निवडला आणि संसदेचे कामकाज सुरू केले. दरम्यान, विरोधकांनी खेळी करत अविश्वास प्रस्ताव फेटाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर सुनावणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने खंडपीठही स्थापन केले आहे.
कलम-5 चा हवाला देत उपसभापतींनी खेळ बदलला
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्तावावरील चर्चा सुमारे 40 मिनिटे उशिराने सुरू झाली. पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू होताच इम्रान सरकारचे मंत्री चौधरी फवाद यांनी अविश्वास प्रस्तावावर सरकारची बाजू मांडली. मात्र उपसभापती कासिम सूरी यांनी अविश्वास प्रस्ताव हा घटनेच्या कलम-5 च्या विरोधात असल्याचे सांगत तो फेटाळला.
राष्ट्रपतींनी अर्ध्या तासात संसद बरखास्त केली
इम्रान खान यांच्या शिफारशीनंतर राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी अर्ध्या तासात पाकिस्तानची नॅशनल असेंब्ली बरखास्त करून नव्या निवडणुकांचा मार्ग मोकळा केला. आता पुढील 90 दिवसांमध्ये पाकिस्तानमध्ये निवडणुका होणार आहेत, तोपर्यंत पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान पाकिस्तानच्या संविधानाच्या कलम 224 अंतर्गत राहतील. यासह पाकिस्तानचे मंत्रिमंडळ बरखास्त करण्यात आले आहे. या निर्णयानंतर नॅशनल असेंब्लीला अतिशय कडेकोट सुरक्षा व्यवस्था देण्यात आली आहे. संसद भवन आणि रेड झोन निवासस्थानाभोवती पाकिस्तान रेंजर्स आणि फ्रंटियर कॉर्प्ससह पोलीस आणि निमलष्करी दलांचे 6,000 हून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.