Video : पाकिस्तानच्या पंजाब विधानसभेत इम्रान खान यांच्या पक्षाच्या नेत्यांनी उपसभापतींना कानशिलात लगावल्या, केसही ओढले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2022 03:40 PM2022-04-16T15:40:52+5:302022-04-16T15:42:32+5:30
पाकिस्तानच्या पंजाब विधानसभेचे अधिवेशन सुरू होताच पीटीआयच्या नेत्यांनी वेलमध्ये येत उपसभापतींवर हल्ला चढवत कानशिलात लगावल्या. तसंच चपलेनंही मारलं.
पाकिस्तानच्या (Pakistan) पंजाब विधानसभेत (Punjab Assembly) शनिवारी इम्रान खान (Imran Khan) यांच्या पक्ष पीटीआयच्या (PTI) नेत्यांनी मर्यादा ओलांडली. विधानसभेचे अधिवेशन सुरू होताच पीटीआय नेत्यांनी वेलवर मध्ये येत हल्लाबोल केला आणि उपसभापती मोहम्मद माजरी यांना चपलेने मारहाण करण्यास सुरुवात केली. एवढेच नव्हे तर पीटीआयचे नेते सोबत लोटा घेऊन आले होते. त्यांनी आधी लोटा फेकून हल्ला केला आणि यानंही त्यांचं मन समाधान झालं नाही, त्यांनी उपसभापतींचे केस ओढून त्यांना कानशिलातही लगावल्या.
दरम्यान, लाहोर उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार पंजाबसाठी नवा मुख्यमंत्री निवडला जाणार आहे. त्यासाठी शनिवारी अधिवेशन बोलावण्यात आले होते. पाकिस्तानच्या पंजाबमध्ये मुख्यमंत्रिपदासाठीचा हमला शाहबाज आणि चौधरी परवेझ इलाही यांच्यात स्पर्धा आहे. या अधिवेशनाची अध्यक्षता उपसभापती मोहम्मद मजरी करत होते. हमजा हे पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाज आणि अन्य पक्षांचे उमेदवार आहेत. तर पीएमएल-क्यू आणि पीटीआय पक्ष इलाही यांना समर्थन देत आहे.
PTI is the worst thing that happened to Pakistan and it's democracy. #PunjabAssemblypic.twitter.com/t8UxJxBicT
— Sania Ashiq (@SaniaaAshiq) April 16, 2022
मिळालेल्या माहितीनुसार, अधिवेशन सुरू होताच आधीपासूनच तयार बसलेल्या पीटीआयच्या नेत्यांनी विधानसभेत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. नॅशनल असेंब्लीतील अविश्वास ठरावासाठी पीटीआयमधून बाहेर पडून विरोधी पक्षात गेलेल्या नेत्यांवर हल्लाबोल करत पीटीआयच्या नेत्यांनी गदारोळ सुरू केला. उपसभापतींनी पीटीआय नेत्यांना तसे करण्यापासून रोखले असता त्यांनी उपसभापती मजरी यांच्यावर लोटा फेकण्यास सुरुवात केली. यानंतरही त्यांचं समाधान झालं नाही आणि त्यांनी वेलमध्ये येऊन उपसभापतींना मारहाण करण्यास सुरुवात केली.
उपसभापतींना मारहाण
पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार पीटीआय नेत्यांनी मजरी यांच्या कानशिलातही लगावल्या. तसंच त्यांचे केसही खेचले. यादरम्यान, विधानसभेत साध्या कपड्यात तैनात असलेल्या पोलिसांनी धाव घेत मजरी यांना बाहेर काढलं. यानंतर कामकाज स्थगित करण्यात आलं.