Imran Khan, Pakistan: फिनिशिंग मुव्हच्या तयारीत होते इम्रान खान, तेवढ्यात हेलिकॉप्टर उतरले; पाकिस्तानात पडद्यामागे काही वेगळेच घडले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2022 12:21 PM2022-04-10T12:21:53+5:302022-04-10T12:24:30+5:30
Imran Khan Pakistan PM: इस्लामाबाद न्यायालायाचे दरवाजेही उघडण्यात आले होते. एका याचिकेवर सुनावणीची शक्यता असल्याचे कर्मचाऱ्यांना सांगण्यात आले होते.
पाकिस्तानच्या राजकारणात शनिवारचा दिवस खूप भयानक राहिला. नॅशनल असेंब्लीमध्ये एकीकडे अविश्वास ठरावावरील मतदानाची तयारी सुरु असताना त्याच्या काही वेळ आधी इम्रान खानच्या निवासस्थानी मोठ्या हालचाली झाल्या. हेलिकॉप्टर उतरले, त्यातून दोन व्यक्ती सशस्त्र सैनिकांच्या गराड्यात उतरले आणि सारे चित्रच पालटून गेले.
जेव्हा पाकिस्तानी संसदेकडे सर्वांच्या नजरा होत्या तेव्हा पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल बाजवा इम्रान खान यांच्या बंगल्यावर आले होते. त्यापूर्वी इम्रान खान यांनी एक महत्वाची आपत्कालीन बैठक बोलावली होती. त्या बैठकीत बाजवांना हटविण्याचे आदेश देण्यात आले होते. इम्रान खान यांनी अखेरच्या क्षणी करिश्मा करण्याचा प्रयत्न केला परंतू आपल्या दारात बाजवांना पाहून त्यांना मोठा धक्का बसल्याचे सांगितले जात आहे.
इम्रान खान यांना हेलिकॉप्टर येणे अपेक्षित होते, परंतू ते बाजवांचे नाही तर त्यांनी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांचे. परंतू झाले उलटेच. बाजवांसोबत आलेले अधिकारी आणि इम्रान यांच्यात जवळपास ४५ मिनिटे चर्चा झाली. या बैठकी काय घडले याची माहिती सार्वजनिक करण्यात आली नाही. परंतू या बैठकीला असलेल्या नेत्यांनी ही बैठक सकारात्मक नव्हती असे बीबीसीला सांगितले.
संरक्षण मंत्रालय बाजवांना काढून टाकण्याची सूचना जारी करणार होते, परंतू ती झाली नाही. इथेच इम्रान खान फेल झाले. जरी आदेश आले असते तरी ते बेकायदा असल्याचे म्हटले गेले होते. यामुळे इस्लामाबाद न्यायालायाचे दरवाजेही उघडण्यात आले होते. एका याचिकेवर सुनावणीची शक्यता असल्याचे कर्मचाऱ्यांना सांगण्यात आले होते. वकील अदनान इकबाल यांनी याचिकेची तयारी केली होती. यात बाजवांच्या बरखास्तीला आव्हान देण्यात येणार होते. या याचिकेत आदेशाचा क्रमांक रिकामा सोडण्यात आला होता.
अखेर सारे फासे उलटल्याने इम्रान खान यांनी संसदेक हजेरी लावली आणि मतदानाआधी खासदारांसह काढता पाय घेतला.