'होय, मी एक प्लेबॉय होतो...' कथित ऑडिओ-व्हिडिओ क्लिपवरुन इम्रान खानचा बाजवावर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2023 04:57 PM2023-01-03T16:57:12+5:302023-01-03T16:58:16+5:30
Imran Khan on Bajwa: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या कथित ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप समोर आल्या आहेत.
Imran Khan Attacked on Qamar Javed Bajwa:पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान कथित ऑडियो आणि व्हिडिओ क्लिवमुळे अडचणीत आले आहेत. यातच त्यांनी निवृत्त लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांच्यावर हल्लाबोल केला आहे. इम्रान खानचा आरोप आहे की, माजी लष्करप्रमुख बाजवा यांनी त्यांना गेल्या वर्षी अविश्वास प्रस्तावाद्वारे घटनात्मक पदावरून हटवण्यापूर्वी त्यांच्या शेवटच्या बैठकीत त्यांना 'प्लेबॉय' म्हटले होते. सोमवारी (2 जानेवारी) लाहोर येथील त्यांच्या निवासस्थानी माध्यमांशी बोलताना पीटीआय अध्यक्षांनी त्यांच्याशी संलग्न असलेल्या 'डर्टी ऑडिओ'बद्दलही भाष्य केले.
'प्लेबॉय' कमेंटवर बाजवाला उत्तर द्या
पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) चे अध्यक्ष इम्रान खान यांनीही आपल्या कार्यकाळात जनरल कमर जावेद बाजवा यांना मुदतवाढ दिल्याबद्दल खेद व्यक्त केला. माजी लष्करप्रमुख बाजवा यांच्यासोबतच्या भेटीचा संदर्भ देत इम्रान खान म्हणाले, "ऑगस्ट 2022 मध्ये जनरल बाजवा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत त्यांनी मला सांगितले की त्यांच्याकडे माझ्या पक्षातील लोकांचे ऑडिओ आणि व्हिडिओ आहेत. त्यांनी मला आठवण करून दिली की मी 'प्लेबॉय' आहे. त्यावर मी त्यांना म्हणालो - होय, मी एक प्लेबॉय होतो. मी कधीही देवदूत असल्याचा दावा केला नाही.''
'बाजवाने माझ्या पाठीत वार केला'
गलिच्छ ऑडिओ आणि व्हिडीओच्या माध्यमातून आम्ही तरुणांना काय संदेश देत आहोत, असा आरोप पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांनी केला. असे ऑडिओ रेकॉर्ड केल्याबद्दल त्यांनी अप्रत्यक्षपणे संबंधित आस्थापनांना जबाबदार धरले. खान म्हणाले की, मला शंका आहे की बाजवा यांनी त्यांना सत्तेतून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. शेहबाज शरीफ यांना पंतप्रधान बनवण्यासाठी ते अत्यंत सावधपणे दुहेरी खेळ करत असल्याचे मला समजले होते. बाजवाने माझ्या पाठीत वार केला,असा अरोपही इम्रानने केला.
बाजवाला मुदतवाढ देणे चूक होती
इम्रान पुढे म्हणाले की, जनरल बाजवाला मुदतवाढ देणे ही माझी मोठी चूक होती. मुदतवाढ मिळाल्यानंतर बाजवाने आपले खरे रंग दाखवून माझ्या सरकारविरोधात कट रचण्यास सुरुवात केली. अलीकडेच इम्रान खानच्या तीन कथित ऑडिओ क्लिप लीक झाल्या होत्या. पाकिस्तानचे गृहमंत्री राणा सनाउल्लाह यांनी दावा केला होता की, या ऑडिओ क्लिप खऱ्या आहेत आणि त्याचप्रमाणे आगामी काळात खानच्या व्हिडिओ क्लिपही समोर येऊ शकतात.