काश्मीर मुद्द्यावरील चर्चेसाठी पाकचे भारताला निमंत्रण
By Admin | Published: August 16, 2016 01:19 AM2016-08-16T01:19:46+5:302016-08-16T01:19:46+5:30
भारत आणि पाकिस्तानने एकत्रितपणे काश्मीर प्रश्न सोडवणे हे दोन्ही देशांचे आंतरराष्ट्रीय दायित्व आहे, असे सांगत पाकिस्तानने भारताला या मुद्द्यावर चर्चेसाठी निमंत्रित केले आहे.
इस्लामाबाद : भारत आणि पाकिस्तानने एकत्रितपणे काश्मीर प्रश्न सोडवणे हे दोन्ही देशांचे आंतरराष्ट्रीय दायित्व आहे, असे सांगत पाकिस्तानने भारताला या मुद्द्यावर चर्चेसाठी निमंत्रित केले आहे. भारत केवळ भारत-पाक संबंधांतील सद्य:स्थितीत महत्त्वाच्या असणाऱ्या मुद्द्यांवर आणि पाकव्याप्त काश्मीरविषयी चर्चा करण्यास तयार असून, जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावर चर्चा केली जाणार नाही, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी नुकतेच संसदेत स्पष्ट केले होते, तरीही पाकने काश्मीरच्या मुद्द्यावर चर्चेसाठी निमंत्रित केले आहे.
चर्चेचे निमंत्रण पाकिस्तानातील भारताचे उच्चायुक्त गौतम बंबावाले यांना देण्यात आल्याचे, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नफीस झकारिया यांनी सोमवारी सांगितले. भारत-पाक संबंधांत काश्मीर हा महत्त्वाचा वादाचा मुद्दा असल्यामुळे, या विषयावर चर्चेसाठी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांना निमंत्रित केल्याचे झकारिया यांनी सांगितले. काश्मीर मुद्द्यावरून भारत आणि पाकिस्तानात सुरू असलेल्या शाब्दिक चकमकींमुळे दोन्ही देशांच्या संबंधांत तणाव आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या ठरावानुसार, जम्मू-काश्मीरचा मुद्दा सोडवणे ही दोन्ही देशांची जबाबदारी आहे, असे या निमंत्रणात म्हटले आहे. भारत केवळ सद्य:स्थितीतील महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यास तयार असल्याचे भारताने स्पष्ट केले आहे.