पाकिस्तानमध्ये खळबळ! आयएसआय एजंटची नेपाळमध्ये गोळ्या झाडून हत्या, दाऊद गँगशी होता संबंध

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2022 04:10 PM2022-09-22T16:10:08+5:302022-09-22T16:10:58+5:30

आयएसआय एजंटला त्याच्या घराबाहेर ठार करण्यात आले. हा एजंट नेपाळमधून बनावट नोटा भारतात पाठवत होता.

Pakistan ISI agent shot dead in Nepal, linked with Dawood gang, smugling of fake indian currency | पाकिस्तानमध्ये खळबळ! आयएसआय एजंटची नेपाळमध्ये गोळ्या झाडून हत्या, दाऊद गँगशी होता संबंध

पाकिस्तानमध्ये खळबळ! आयएसआय एजंटची नेपाळमध्ये गोळ्या झाडून हत्या, दाऊद गँगशी होता संबंध

googlenewsNext

भारताविरोधात कारवाया करण्यासाठी पाकिस्ताननेपाळच्या भूमीचा नेहमीच वापर करत आला आहे. भारताची नेपाळबाबत मवाळ भूमिका असल्याने गँगस्टर, तस्करांचे नेपाळ हे आश्रयाचे ठिकाण बनले आहे. यामुळे पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआय नेपाळमार्गेच कारवाया करत असते. याच आयएसायच्या गुप्तहेराला आज गोळ्या घालून ठार मारण्यात आले. 

आयएसआय एजंटला त्याच्या घराबाहेर ठार करण्यात आले. हा एजंट नेपाळमधून बनावट नोटा भारतात पाठवत होता. या एजंटची हत्या कोणी केली याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, त्याच्या घराबाहेर सीसीटीव्ही कॅमेरा लावलेला होता, त्यात गोळी झाडतानाचे दृष्य कैद झाले आहे. कारमधून उतरत असताना त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. या एजंटचे दाऊद गँगशीदेखील संबंध होते, असे सांगितले जात आहे. 

पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजेंससाठी काम करणाऱ्या एजंटची ओळख लाल मोहम्मद उर्फ ​​मोहम्मद दर्जी अशी पटली आहे. आयएसआयच्या सांगण्यावरून लाल मोहम्मद पाकिस्तान आणि बांग्लादेशातून बनावट भारतीय चलन नेपाळमध्ये आणायचा आणि तेथून भारतात पुरवायचा. लाल मोहम्मदने आयएसआयला लॉजिस्टिक सपोर्टमध्ये मदत केली होती आणि अंडरवर्ल्ड गँगस्टर दाऊद इब्राहिमचे डी-गँगशी संबंध होते. त्याने इतर आयएसआय एजंटनाही आश्रय दिला होता, असे इंडिया टुडेने भारतीय गुप्तचर अधिकाऱ्यांच्या हवाल्याने म्हटले आहे. 

सीसीटीव्ही फुटेजमध्ये लाल मोहम्मद काठमांडूच्या गोथर भागात त्याच्या घराबाहेर आलिशान कारमधून खाली उतरताना दिसत आहे. त्याच्यावर दोन हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या. गोळीबार होताच लाल मोहम्मदने त्याच्या कारच्या मागे लपण्याचा प्रयत्न केला. लाल याला वाचविण्यासाठी त्याच्या मुलीने घराच्या पहिल्या मजल्यावरून खाली उडी मारली. मात्र, ती पोहोचेपर्यंत हल्लेखोरांनी त्याचे काम तमाम केले होते. 

आयएसआयसाठी नेपाळ हे लपण्याचे सुरक्षित ठिकाण बनले आहे. या ठिकाणी राहून दहशतवादी कारवाया करणे देखील त्यांना सोपे जाते. काही वर्षांपूर्वी पाकिस्तानी लष्करातील एक निवृत्त अधिकारी नेपाळमधूनच बेपत्ता झाला होता. त्यानंतर यामागे भारतीय गुप्तचर संस्था असल्याचा संशय पाकिस्तानने व्यक्त केला होता.
 

Web Title: Pakistan ISI agent shot dead in Nepal, linked with Dawood gang, smugling of fake indian currency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.