पाकिस्तानातील हरवलेले मुख्यमंत्री सापडले! थेट विधासभेत लावली हजेरी, घटनाक्रमही सांगितला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 04:14 PM2024-10-07T16:14:20+5:302024-10-07T16:15:19+5:30
Pakistan, Missing CM found, Ali Amin Gandapur: पाकिस्तानात इम्रान खान यांच्या समर्थनार्थ आंदोलने सुरु असताना खैबर पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री अली अमीन गंडापूर बेपत्ता झाल्याचा आश्चर्यकारक दावा करण्यात आला होता.
Pakistan, Missing CM found: भारताचा शेजारी देश पाकिस्तानमध्ये सध्या राजकीय तणावाचे वातावरण आहे. गेल्या एक वर्षापासून तुरुंगात असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या समर्थनार्थ आंदोलक रस्त्यावर उतरून निदर्शने करत होते. याचदरम्यान, पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे नेते आणि खैबर पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री अली अमीन गंडापूर हे बेपत्ता झाल्याचा आश्चर्यकारक दावा करण्यात आला होता. ते बेपत्ता झाल्याचे पक्षाचे म्हणणे होते. तशातच बेपत्ता असलेल्या खैबर पख्तुनख्वाचे मुख्यमंत्री अली अमीन गंडापूर ( Ali Amin Gandapur ) विधानसभेत हजर झाले. इस्लामाबादमध्ये पाकिस्तानच्या तेहरीक-ए-इन्साफच्या निदर्शनादरम्यान त्यांना अटक झाल्याचे म्हटले जात होते पण त्यांनी मात्र अटकेचे वृत्त नाकारले. संपूर्ण वेळ मी खैबर पख्तूनख्वा हाऊसमध्ये उपस्थित होतो असे ते म्हणाले.
सुरक्षेच्या कारणास्तव इस्लामाबाद आणि रावळपिंडी या दोन शहरांमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले होते. इस्लामाबादमध्ये आंदोलन करण्याचा प्रयत्न केल्यानंतर ते शनिवारी बेपत्ता झाला होते आणि त्यानंतर त्यांचा शोध लागला नव्हता. आता ते रविवारी स्वत:हून पुढे आले आणि खैबर पख्तूनख्वा हाऊसवर छापा टाकल्याबद्दल आणि कर्मचारी व महिलांशी गैरवर्तन केल्याबद्दल इस्लामाबादचे आयजीपी नासिर अली रिझवी यांच्यासह अधिकाऱ्यांना फटकारले.
पोलीस महानिरिक्षकांविरुद्ध तक्रार
इस्लामाबादच्या IG विरुद्ध FIR नोंदवण्याची घोषणा करताना त्यांनी सभागृहात माफी मागावी लागेल, असे गंडापूर यांनी सांगितले. रावळपिंडीच्या तुरुंगात एका वर्षाहून अधिक काळ बंदिस्त असलेल्या इम्रान खानच्या पक्षाने न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या सुटकेसाठी अनेक आंदोलने केली. यात आम्ही काय गुन्हा केला? असा सवाल त्यांनी केला.
दरम्यान, पीटीआय पक्षाने सीएम अली अमीन गंडापूर बेपत्ता झाल्यानंतरही इम्रान खानच्या सुटकेच्या समर्थनार्थ आंदोलन सुरूच ठेवले होते. पक्षाने रात्री बैठक घेतली. जोपर्यंत इम्रान खान हे निदर्शने संपवण्याचा आदेश देत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला.