इम्रान यांना भारतात जाण्याचा सल्ला देऊन मरियम नवाज यांनी अटलबिहारी वाजपेयींचा उल्लेख का केला?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2022 11:44 AM2022-04-09T11:44:05+5:302022-04-09T11:48:04+5:30
Maryam Nawaz : इम्रान खान यांनी आपल्या भाषणात भारताचे कौतुक केले होते, यावरून मरियम नवाज यांनी त्यांना टोला लगावत सल्ला दिला आहे.
पाकिस्तानमध्ये राजकीय संकट सुरूच आहे. दरम्यान, पीएमएल-एनच्या ( PML-N) नेत्या आणि माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची मुलगी मरियम नवाज (Maryam Nawaz) यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर हल्लाबोल केला आहे. इम्रान खान यांनी आपल्या भाषणात भारताचे कौतुक केले होते, यावरून मरियम नवाज यांनी त्यांना टोला लगावत सल्ला दिला आहे.
पीएमएल-एन नेत्या मरियम नवाज यांनी शुक्रवारी इम्रान खान यांना फटकारले आणि त्यांना देश सोडून भारतात जाण्याचे आवाहन केले. इम्रान खान यांना भारत इतकाच आवडत असेल तर त्यांनी पाकिस्तान सोडून भारतात जावे, असे मरियम नवाज यांनी म्हटले आहे. तुम्ही पाकिस्तानातील जीवन सोडून भारतात शिफ्ट व्हा, असा सल्ला मरियम नवाज यांनी दिला आहे.
अटल बिहारी वाजपेयींचा उल्लेख
इम्रान खान यांच्यावर निशाणा साधताना मरियम नवाज यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर म्हटले आहे की, "जे भारताची स्तुती करत आहेत, त्यांना हे माहीत पाहिजे की, भारताच्या अनेक पंतप्रधानांविरुद्ध 27 अविश्वास प्रस्ताव आले आहेत, परंतु कोणीही संविधान, लोकशाही आणि नैतिकतेशी खेळले नाही. अटल बिहारी वाजपेयींचा एका मताने पराभव झाला. त्यांनी तुमच्यासारखे देश, संविधान आणि राष्ट्र ओलिस ठेवले नाही." दरम्यान, इम्रान खान यांच्या सरकारला गुरुवारी मोठा धक्का बसला, जेव्हा पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने उपसभापती कासिम सूरी यांचा निर्णय रद्द् केला. ज्यामध्ये त्यांनी विरोधकांनी आणलेला अविश्वास प्रस्ताव फेटाळला होता.
جس بھارت کے قصیدے پڑھ رہے ہیں وہاں مختلف وزرائے اعظم کے خلاف عدم اعتماد کی ستائیس تحریکیں آئیں۔ کسی ایک نے بھی آئین، جمہوریت اور اخلاقیات سے یہ کھلواڑ نہی کیا۔ واجپائی ایک ووٹ سے ہارا، گھر چلا گیا — آپ کی طرح ملک، آئین اور قوم کو یرغمال نہیں بنایا !
— Maryam Nawaz Sharif (@MaryamNSharif) April 8, 2022
इम्रान यांच्याकडून भारताच्या परराष्ट्र धोरणाचे कौतुक!
इम्रान खान यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणाचे कौतुक केले होते. आपल्या सरकारविरोधातील महत्त्वपूर्ण अविश्वास ठरावाच्या एक दिवस आधी, इम्रान खान म्हणाले की, रशियाबाबत भारताचे परराष्ट्र धोरण काय असावे, हे सांगण्याची हिंमत कोणत्याही युरोपीय राजदूतामध्ये नाही. भारतीय खूप अभिमानी लोक आहेत. त्यांना कोणीही आज्ञा देऊ शकत नाही. पण मी म्हणतो की कोणत्याही महासत्तेला भारतासोबत असे करण्याचा किंवा भारताच्या परराष्ट्र धोरणात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. दरम्यान, आज नॅशनल असेंब्लीमध्ये इम्रान सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर मतदान होणार आहे.