पाकिस्तान म्हणजे ‘टेररिस्तान’, संयुक्त राष्ट्रात भारताचा जोरदार हल्लाबोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 06:08 AM2017-09-23T06:08:27+5:302017-09-23T06:08:57+5:30
दहशतवादाचा उपयोग एक साधन म्हणून करणे थांबवा, असा इशारा परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला दिला. त्याचबरोबर संयुक्त राष्ट्राच्या महासभेत भारताच्या संयुक्त राष्ट्रातील परमनंट सेक्रेटरी श्रीमती इनाम गंभीर पाकिस्तानचा उल्लेख थेट टेररिस्तान असाच केला.
न्यू यॉर्क : दहशतवादाचा उपयोग एक साधन म्हणून करणे थांबवा, असा इशारा परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला दिला. त्याचबरोबर संयुक्त राष्ट्राच्या महासभेत भारताच्या संयुक्त राष्ट्रातील परमनंट सेक्रेटरी श्रीमती इनाम गंभीर पाकिस्तानचा उल्लेख थेट टेररिस्तान असाच केला. पाकिस्तान म्हणजे दहशतवादाची भूमी आहे. दहशतवाद्यांना ते आपले नंदनवन वा स्वर्गच वाटते. त्या ठिकाणी दहशतवादाची निर्मिती होते आणि जागतिक स्तरावर त्याची निर्यात होते, अशी जहाल टीकाही इनाम गंभीर यांनी केली.
सुषमा स्वराज यांनी दहशतवादाचा मुद्दा अतिशय प्रभावीपणे मांडला. काही देशांच्या मदतीने चालणाºया अतिरेकी संघटनांवर त्यांनी प्रहार केला. देशाचे धोरण म्हणून दहशतवादाचा उपयोग करणे बंद करा, असा इशारा त्यांनी पाकिस्तानला दिला. संयुक्त राष्ट्राने घोषित केलेल्या दहशतवादी संघटनांना आश्रय देणे बंद करावे तसेच या संघटनांना पुरविली जाणारी आर्थिक रसद थांबवावी, असेही सुषमा स्वराज म्हणाल्या. संयुक्त राष्ट्र महासभेच्या बैठकीत सुषमा स्वराज यांनी दहशतवादाशी एकत्रितपणे लढण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. दहशतवादाचे पोषण करणारी जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीचाच अंत करण्याची गरज असल्याचे स्वराज म्हणाल्या.
पाकचे पंतप्रधान शाहिद खाकान अब्बासी यांनी महासभेत काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर प्रतिक्रिया देण्याचा अधिकार वापरत इनाम गंभीर म्हणाल्या की, पाकिस्तानचे सर्व शेजारी देश त्यांचा धूर्तपणा, कपट कारस्थाने जाणून आहेत. (वृत्तसंस्था)
>कोण ही नवदुर्गा?
पाकला टेररिस्तान म्हणणारी या ‘नवदुर्गा’ आहेत इनाम गंभीर. त्या संयुक्त राष्ट्रात भारताच्या पहिल्या स्थायी सचिव आहेत. त्या दिल्लीच्या राहणाºया असून, २००५च्या बॅचच्या आयएफएस अधिकारी आहेत.
बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनीही पाकिस्तानवर टीका केली. त्या म्हणाल्या की याच पाकिस्तानच्या सैन्याने १९७१ मध्ये भयंकर नरसंहार घडवून आणला. त्यात आमच्या देशातील ३० लाख निर्दोष नागरिक मारले गेले. पाक सैन्याने त्यावेळच्या पाकिस्तानातील बांग्लादेशवर २५ मार्च १९७१ च्या रात्री अचानक हल्ला केला. त्यानंतर युद्ध सुरू झाले आणि १६ डिसेंबर रोजी हे युद्ध संपले.