गोर्या मुलींवर बलात्कार करतात पाकिस्तानी..., ब्रिटनच्या गृहमंत्र्यांचा खुलासा; शाहबाज सरकार भडकलं
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2023 08:15 PM2023-04-05T20:15:42+5:302023-04-05T20:16:05+5:30
पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाने अशा प्रकारच्या विधानांवरून गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला आहे...
इस्लामाबाद - ब्रिटनच्या गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन यांनी नुकतीच स्काय न्यूजला एक मुलाखत दिली होती. यात त्यांनी ब्रिटिश पाकिस्तानी पुरुषांवर गंभीर आरोप केला होता. पाकिस्तानी तरुण ब्रिटनमध्ये गोऱ्या ब्रिटिश मुलींना नुकसान पोहोचवतात. तसेच काही ब्रिटिश पाकिस्तानी यूकेमध्ये मुलांच्या लैंगिक शोषणाचे नेटवर्क चालवतात, असे त्यांनी म्हटले होते. यावर पाकिस्तान चांगलाच भडकला आहे. ब्रिटनच्या गृहमंत्री ब्रेव्हरमन यांचे वक्तव्य 'भेदभाव करणारे आणि झेनोफोबिक' असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. एवढेच नाही, तर पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाने अशा प्रकारच्या विधानांवरून गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला आहे.
पाकिस्तानचा इशारा -
ब्रेव्हरमन यांच्या वक्तव्यावर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात बोलताना परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मुमताज जहारा बलोच म्हणाल्या, 'असे वक्तव्य धोकादायक सवयींना प्रोत्साहन देईल.' याच बरबोर, ब्रेव्हरमन यांना नॅशनल सोसाइटी फॉर द प्रिव्हेंशन ऑफ क्रुएल्टी टू चिल्ड्रननेही (NSPCC) इशारा देण्यात आला होता, की लैंगिक छळ करणारे केवळ 'एकाच बॅकग्राउंडचे नाहीत. केवळ वंशिक दृष्ट्या विचार करून बाल शोषणाचा विचार करणे मूर्खपणाचे ठरेल.
काय म्हणाल्या होत्या ब्रेव्हरमन? -
ब्रेव्हरमन म्हणाल्या होत्या, अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्यां लोकांच्या समूहात जवळपास सर्वच ब्रिटिश-पाकिस्तानी लोक आहेत. अधिकाऱ्यांनी समाजातील कोणत्याही घटकाचे मन दुखावले जाणार नाही याची अत्यंत काळजी घेत, अवलंबल्या गेलेल्या राजकीय धोरणांमुळे आणि वर्णद्वेषी तथा धर्मांध म्हटल्या जाण्याच्या भीतीने या गुन्ह्यांकडे डोळेझाक केली आहे.
ब्रेव्हरमन स्काच न्यूजसोबत बोलताना म्हणाल्या, 'गोर्या मुली कधी-कधी अडचणीत असताना त्यांच्यावर बलात्कार केला गेल्याचे, त्यांना अंमली पदार्थ दिल्याचे आणि बाल लैंगिक अत्याचार करणाऱ्या टोळ्या अथवा त्यांच्या नेटवर्कमधील ब्रिटिश पाकिस्तानी पुरुषांच्या गटांने त्यांना इजा पोहोचवल्याचे निदर्शनास आले आहे.