पाकच्या मंत्र्याला लसूण आणि आले यातला फरकही माहीत नाही; पाहा व्हिडिओ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2021 01:57 PM2021-11-24T13:57:54+5:302021-11-24T13:58:51+5:30
Pakistan Minister Fawad Chaudhry : पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांच्या या ज्ञानाचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्या सरकारमधील मंत्री फवाद चौधरी (Fawad Chaudhry) हे आपल्या अनेक वादग्रस्त विधानांसाठी चर्चेत आहेत. यातच आता ज्ञानाच्या बाबतीतही त्यांची झोळी रिकामी असल्याचे त्यांनी सिद्ध केले आहे. फवाद चौधरी हे महागाईच्या मुद्द्यावर पत्रकार परिषद घेत होते आणि यावेळी त्यांनी आपल्या ज्ञानाचे जे काही प्रदर्शन केले, ते पाहून पाकिस्तानमधील नागरिकांनाही हसू आवरले नाही. या मंत्री महोदयांनी लसूणला ( Garlic) आले (Ginjer) म्हणून सांगितले आणि पत्रकार परिषदेत शेवटपर्यंत त्यावर ते राहिले.
पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांच्या या ज्ञानाचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फवाद चौधरी हे महागाईच्या मुद्द्यावर पत्रकार परिषद घेत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. दर कमी झाल्याबद्दल ते म्हणतात, 'लसूण म्हणजे आले'. अनेकांनी त्यांना त्यांची चूक लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला, मात्र मंत्री आपल्या मुद्द्यावर ठाम राहिले. लसूण म्हणजे फक्त आले याचा त्यांनी पुनरुच्चार केला.
"Garlic is adrak," information minister Fawad Chaudhry. One learns a new thing everyday. pic.twitter.com/oXjgey4Kd8
— Naila Inayat (@nailainayat) November 23, 2021
'ते पाकिस्तानचे आइन्स्टाईन आहेत'
लसूणला हिंदीत 'लहसुन' तर आल्याला अदरक म्हणतात. काही लोकांनी फवाद चौधरीच्या वक्तव्याचा बचाव करत म्हटले की, लसूण आणि आले याबाबत हिंदी भाषेत चुका होतात. तर एका यूजरने लिहिले की, 'ते पाकिस्तानचे आइन्स्टाईन आहेत'. तसेच, कंगना राणौतच्या तनु वेड्स मनु रिटर्न्स या चित्रपटातील एक संवाद अनेक यूजर्सनी शेअर केला आहे, ज्यामध्ये कंगना म्हणते, 'हालत देखी है, अदरक हो गया है यह आदमी. कहीं से भी बढ़ा जा रहा है.'
दरम्यान, अलीकडेच दहशतवादाच्या मुद्द्यावरून खुद्द फवाद चौधरी यांनी पाकिस्तानच्या शाळा-कॉलेजवर निशाणा साधला होता. देशातील धर्मांधतेला मदरसे जबाबदार नसून 1980 आणि 1990 च्या दशकात याच हेतूने नियुक्त करण्यात आलेले शाळा-महाविद्यालयातील शिक्षक आहेत, असे ते म्हणाले होते. तसेच, पाकिस्तानला आजचा सर्वात मोठा धोका कोणत्याही परकीय शक्तीकडून नसून स्वतःपासून आहे, असेही फवाद चौधरी यांनी म्हटले होते.