"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 22:53 IST2025-04-24T22:53:19+5:302025-04-24T22:53:49+5:30
"भारत नेहमीप्रमाणेच आरोप करत आहे आणि यावेळीही तसाच खेळ खेळला आहे. जर त्यांच्याकडे पाकिस्तानच्या सहभागाचा काही पुरावा असेल तर तो त्यांनी आपल्यासमोर आणि जगासमोर सादर करावा."

"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधत कठो पावले उचलायला सुरवात केली आहे. यानंतर, पाकिस्तानने याला आव्हान दिले आहे. जर भारताकडे या दहशतवादी हल्ल्याचे काही पुरावे असतील, तर ते त्यांनी सादर करावेत, असे पाकिस्तानचे उपपंतप्रधान तथा परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी म्हटले आहे. राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीनंतर ते गुरुवारी (२४ एप्रिल २०२५) पत्रकार परिषदेत बोलत होते.
डार म्हणाले, "भारत नेहमीप्रमाणेच आरोप करत आहे आणि यावेळीही तसाच खेळ खेळला आहे. जर त्यांच्याकडे पाकिस्तानच्या सहभागाचा काही पुरावा असेल तर तो त्यांनी आपल्यासमोर आणि जगासमोर सादर करावा." यावेळी, परराष्ट्र मंत्री डार यांनी एनएससीच्या निर्णयांचा उल्लेख करत, पाकिस्तानने भारताला त्याच पद्धतीने प्रत्युत्तर दिले असल्याचेही म्हटले आहे. यावेळी त्यांच्यासोबत संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ, कायदा मंत्री आझम नजीर तरार, माहिती मंत्री अताउल्लाह तरार आणि पाकिस्तानचे अॅटर्नी जनरल (एजीपी) मन्सूर अवान हे देखील उपस्थित होते.
कसल्याही आव्हानासाठी पाकिस्तान तयार -
डार पुढे म्हणाले, "आपल्याला माहीत आहे की, भारतीय गुप्तचर संस्था त्यांचे समर्थन करत आहेत आणि परदेशी लोक आयईडी (इम्प्रोवाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिवाइस) निर्यात करण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण कल्पना करू शकता की ते, ते कुठे निर्यात करण्याचा प्रयत्न करत असतील. मात्र, पाकिस्तानचे सशस्त्र दल कोणत्याही आव्हानाचा सामना करण्यास तयार आहे.
यावेळी, संरक्षणमंत्री आसिफ म्हणाले, जरी भारताने या घटनेसाठी थेट पाकिस्तानचे नाव घेतले नसले तरी, मीडिया आणि इतर देश पाकिस्तानला दोषी ठरवत आहेत. जर भारताने अधिकृतपणे पाकिस्तानचे नाव घेतले, तर त्याला त्याचेही उत्तर मिळेल. पाकिस्तानला स्वसंरक्षणाचा पूर्ण अधिकार आहे. एवढेच नाही तर, "नरेंद्र मोदी हे जगातील एकमेव नेते आहेत, ज्यांना अमेरिकेने दहशतवादाच्या आधारावर व्हिसा देण्यास नकार दिला होता," असेही आसिफ म्हणाले.