पाकिस्तानी चलनाचा स्वीकार करणार तालिबान; अफगाणवर नियंत्रण मिळवण्यासाठी पाकची 'खेळी'!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2021 11:32 AM2021-09-10T11:32:12+5:302021-09-10T11:38:00+5:30
आता पाकिस्तानने अफगाणिस्तानसोबत आपल्या चलनातच व्यापार सुरू करणार असल्याचं म्हटलं आहे.
अफगाणिस्तानमध्येतालिबानी सत्तेला सुरुवातीपासूनच पाकिस्ताननं पाठिंबा दिलेला आहे. तर दुसरीकडे तालीबान देखील पाकिस्तान आपलं दुसरं घर असल्याचं वारंवार बोलत आले आहेत. आता पाकिस्तानने अफगाणिस्तानसोबत आपल्या चलनातच व्यापार सुरू करणार असल्याचं म्हटलं आहे.
पाकिस्तानचे केंद्रीय अर्थमंत्री शौकत तारिन यांनी गुरुवारी याबाबतची घोषणाच केली आहे. अफगाणिस्तानसोबत पाकिस्तानी चलनानेच व्यापार करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे, असं तारिन यांनी जाहीर केलं आहे. अफगाणिस्तानकडे डॉलर्सची कमतरता आहे त्यामुळे पाकिस्तानी चलनाचाच वापर अफगाणिस्तानसोबतच्या व्यापारावेळी केला जाईल असं पाक सरकारनं म्हटलं आहे.
पाकिस्तान एक पथक अफगाणिस्तानला पाठवणार
"अफगाणिस्तानातील परिस्थितीवर सातत्यानं आम्ही लक्ष ठेवून आहोत. अफगाणिस्तानच्या अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी पाकिस्तान शक्य ती सर्व मदत करणार आहे. याच दृष्टीकोनातून एक पथक अफगाणिस्तानला पाठविण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे", असं शौकत तारिन म्हणाले.
तालिबाननं वचन मोडलं! काबुलमध्ये नॉर्वेच्या दूतावासावर कब्जा, विद्यार्थ्यांची पुस्तकं फाडली
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसह आणखा काही संस्थांनी अफगाणिस्तानला दिल्या जाणाऱ्या निधीवर बंधनं घातली आहेत. यासोबतच अफगाणिस्तानच्या काही मालमत्ता देखील फ्रीज करण्यात आल्या आहेत. त्यामुळे तालिबानला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.
दुसरीकडे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचीही अवस्था काही फारशी ठिक नाही. अफगाणिस्तानसोबत व्यापार केल्याचा परिणाम काही दिवसांनी पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम पाहायला मिळेल अशी आशा पाकच्या अर्थमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. पाकिस्तानचं सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) चालू आर्थिक वर्षात ४ टक्क्यांवरुन ४.८ टक्क्यांवर पोहोचली आहे. सध्या एका डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपयाचं मूल्य तब्बल १६९ पाकिस्तानी रुपये इतकं झालं आहे.