पाकिस्तान - फेसबूकवरील धर्मद्रोही पोस्टमुळे जमावाने महिलेला नातींसह जाळले
By admin | Published: July 28, 2014 05:49 PM2014-07-28T17:49:40+5:302014-07-28T17:50:25+5:30
फेसबूकवर धर्मद्रोही पोस्ट टाकल्यामुळे संतप्त जमावाने एका महिलेला तिच्या नातींसह जाळून ठार मारल्याची अमानुष घटना पाकिस्तानात घडली आहे
Next
>ऑनलाइन टीम
इस्लामाबाद, दि. २८ - फेसबूकवर धर्मद्रोही पोस्ट टाकल्यामुळे संतप्त जमावाने एका महिलेला तिच्या नातींसह जाळून ठार मारल्याची अमानुष घटना पाकिस्तानात घडली आहे. मृतांमध्ये एका सातवर्षीय मुलीचा व तिच्या लहान बहिणीचा समावेश असून ते अहमदी (१९८४ सालच्या पाकिस्तानी कायद्यानुसार त्यांना गैर-मुस्लिम मानण्यात येते) समुदायातील होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर घटना इस्लामाबादपासून २२० किमी अंतरावर असलेल्या गुजरानवाला येथे घडली. फेसबूकवर धर्मद्रोही पोस्ट टाकल्यामुळे दोन तरूणांमध्ये झालेल्या बाचाबाचीनंतर रविवारी हा प्रकार घडला. धर्मद्रोही पोस्ट टाकणा-या या तरूणावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत दीडशे लोकांचा समुदाय पोलिस स्टेशनमध्ये आला. पोलिस याप्रकरणी मध्यस्थी करत असतानाच दुसरीकडे जमाव 'अहमदीं'च्या घरावर चालून गेले व त्यांनी त्यांच्या घरावर हल्ला करत ते पेटवून टाकले. दरम्यान ज्या तरूणावर ही पोस्ट टाकण्याचा आरोप आहे, त्याला मात्र या घटनेत कोणतीही इजा झालेली नाही असे समजते.
आत्तापर्यंतच्या काळातील हा अतिशय निंदनीय हल्ला असल्याचे सांगत 'अहमदी' समुदायाचे प्रवक्ते सलीमु उद दीन यांनी या हल्ल्याचा निषेध नोंदवला. तसेच हा हल्ला होऊ नये यासाठी पोलिसांनी कोणताही प्रयत्न केला नाही, ते फक्त घडलेला प्रकार पाहत उभे होते, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.