पाकिस्तानने दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त केलेच पाहिजेत - बराक ओबामा
By admin | Published: January 24, 2016 05:11 PM2016-01-24T17:11:18+5:302016-01-24T17:39:21+5:30
पाकिस्तानच्या भूमीवरून दहशतवादी कारवाया करणा-या दशतवाद्यांचे तळ पाकिस्तानच उद्धवस्त करू शकतो आणि त्यांनी ही कृती करावीच' अशा थेट व कडक शब्दांतील संदेश अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी दिला.
Next
>ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. २४ - ' पाकिस्तानच्या भूमीवरून दहशतवादी कारवाया करणा-या दशतवाद्यांचे तळ पाकिस्तानच उद्धवस्त करू शकतो आणि त्यांनी ही कृती करावीच' अशा थेट व कडक शब्दांतील संदेश अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी पाकिस्तानी नेतृत्वास दिला. तर दुसरीकडे पठाणकोट येथील दहशतवादी हल्ल्यानंतरही पाकिस्तानी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याशी संवाद साधल्याबद्दल ओबामांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा केली. 'पठाणकोटमधील हवाई दलाच्या तळावर झालेला हल्ला म्हणजे भारत ब-याच काळापासून सहन करत असलेल्या असमर्थनीय दहशतवादाचे आणखी एक उदाहरण आहे,' असेही ओबामा म्हणाले.
' २०१४ साली पेशावरच्या लष्करी शाळेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानने दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ले केले होते, तेच योग्य धोरण आहे. त्यामुळे आपल्याच भूमीवरून हल्ले करणा-या दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त करून दहशतवादाविरोधातील लढाईबाबत आपण किती गंभीर आहोत, हे जगाला दाखवण्याची संधी आताही पाकिस्तानकडे आहे आणि त्यांनी तसे करावेच, असा सल्ला ओबामांनी दिला. या भागात व एकंदरच संपूर्ण जगात दहशतवाद्यांना कडक शासन करण्यासंदर्भात समान धोरणाची आवश्यकता आहे', असे मतही त्यांनी व्यक्त केले.
पठाणकोटमधील दहशतवादी हल्ल्याचा अमेरिकेनेही तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे असे सांगतानाच दहशतवाद्यांच्या हल्ल्यात इतरांच्या जीवांचे रक्षण करताना धारातीर्थी पडलेल्या भारतीयांना ओबामांनी सलाम केला.