'पाकव्याप्त काश्मिरात लोक उपासमारीने मरत आहेत'; PoK कार्यकर्त्याने पाक पंतप्रधानांना सुनावलं!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2024 03:21 PM2024-03-04T15:21:32+5:302024-03-04T15:26:14+5:30
पाकिस्तान PM शाहबाज यांनी काश्मीरची तुलना पॅलेस्टाईनशी केली.
Pakistan Shahbaz Sharif PoK India: शाहबाज शरीफ हे दुसऱ्यांदा पाकिस्तानचेपंतप्रधान झाले. गेल्या महिन्यात झालेल्या निवडणुकीत त्यांचा पक्ष बहुमताच्या आकड्यापेक्षा खूप मागे होता, पण काही तडजोडी करत आता ते या पदी विराजमान होणार आहेत. तशातच त्यांनी पाकव्याप्त काश्मीरबाबत गरळ ओकली. शाहबाज शरीफ पाकिस्तानी जनतेला आवाहन करताना म्हणाले की त्यांना काश्मीर हवे आहे. पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये भाषण देताना ते म्हणाले की, काश्मीरला स्वतंत्र करायचे आहे. काश्मीरची तुलनाही त्यांनी पॅलेस्टाईनशी केली. यासोबतच काश्मीर आणि पॅलेस्टाईनवर ठराव आणण्याचे आवाहनही त्यांनी केले. मात्र त्यांच्या या दाव्यांना पाकव्याप्त काश्मीरमधील सामाजिक कार्यकर्ते अमजद अयुब मिर्झा यांनी चोख प्रत्युत्तर दिले.
"पाकव्याप्त काश्मीरमधील 'मानवतावादी संकट' स्वीकारण्याचे धाडस शहबाज शरीफ यांच्यात नाही. पीओकेमधील लोक उपासमारीने मरत आहेत हे सत्य आहे, असा दावा मिर्झा यांनी केला. काश्मीरवरून शाहबाज यांना आरसा दाखवत अमजद अयुब मिर्झा म्हणाले की, शाहबाजचे पाकव्याप्त काश्मीरबाबतचे दावे वास्तवात चुकीचे आहेत. पीओकेमध्ये मानवतावादी संकट आहे. भुकेने लोक मरत आहेत. परिस्थिती बिकट होत चालली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना पगार मिळत नाही. दवाखान्यात औषध शिल्लक नाही. शिक्षण व्यवस्था कोलमडली आहे. पाकिस्तानी पदवी कोणत्याही देशात वैध नाही. हे सत्य स्वीकारण्याचे धाडस शाहबाज शरीफ यांच्यात राहिलेले नाही," अशा शब्दांत मिर्झा यांनी शाहबाज शरीफ यांना आरसा दाखवला.
मिर्झा पुढे म्हणाले, "पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी गेल्या वर्षी ऑगस्टपासून सुरू असलेल्या 'इलेक्ट्रिसिटी बॉयकॉट' मोहिमेबद्दल एक शब्दही बोलले नाहीत. विकासाविषयी किंवा गिलगिट-बाल्टिस्तानच्या लोकांना अन्यधान्य देण्याबद्दल ते काहीही बोलले नाहीत. पीओके आणि पाकव्याप्त गिलगिट-बाल्टिस्तानमधील लोक ७६ वर्षांपासून पाकिस्तानी लष्कराकडून वेढ्यात बंदी सारखे राहत आहेत. त्यामुळे हे नवे सरकारही त्यांच्यासाठी काही करणार नसल्याचे जनतेच्या मनात स्पष्ट झाले आहे."