Pakistan PM Shahbaz Sharif On China : "चीन सुख-दुःखाचा साथीदार, मैत्री अबाधित राहणार"; सत्तेत येताच पाकिस्तानचे पंतप्रधान ड्रॅगनसमोर गुडघ्यांवर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 07:45 PM2022-04-11T19:45:58+5:302022-04-11T19:46:22+5:30
Pakistan PM Shahbaz Sharif On China : सत्तेत येताच पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी चीनचं गुणगान गाण्यास सुरूवात केली आहे. आमची मैत्री कायम राहील, असं वक्तव्यही त्यांनी केलं.
Pakistan PM Shahbaz Sharif On China : पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या राजकीय गोंधळाचा अखेर अंत झाला आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी शाहबाज शरीफ यांची वर्णी लागली. इम्रान खान यांना आपला पाच वर्षांचा कार्यकाळही पूर्ण करता आला नाही. पंतप्रधान बनण्यापूर्वीच शाहबाज शरीफ यांनी काश्मीरबद्दल वक्तव्य करण्यास सुरूवात केली होती. तसंच आता सत्ता हाती येताच त्यांनी चीनच्या पुढे गुडघेच टेकले. चीन हा आपला सुख-दु:खातील साथीदार असून आमची मैत्री अबाधित राहील, असं वक्तव्य त्यांनी केलं.
"चीन हा पाकिस्तानचा विश्वासू आणि सुख-दु:खातील साथीदार आहे. चीनने पाकिस्तानला नेहमीच पाठिंबा दिला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरही आम्हाला साथ दिली. चीनने पाकिस्तानला नेहमीच आपला मित्र मानलं आहे. ही मैत्री राज्यकर्त्यांची मैत्री नसून जनतेची मैत्री आहे," असं मत शरीफ यांनी व्यक्त केलं.
"कोणी काहीही केलं तरी आमची मैत्री तुटणार नाही. यापूर्वीच्या सरकारनं ही मैत्री कमकुवत करण्यासाठी जे काही केलं ते त्रासदायक आहे. पाकिस्तान आणि चीनची मैत्री अबाधित आहे. आम्ही CPEC वर आणखी तेजीनं काम करू. आम्ही क्षी जिनपिंग सरकारचे आभारी आहोत," असंही ते म्हणाले.
चीनचेही बदलले सूर
पाकिस्तानात सत्ताबदल होताच चीनचेही सूर बदलल्याचं दिसून आलं. पाकिस्तानात नवं सरकार स्थापन झाल्यावर आपले पाकिस्तानशी संबंध अधिक दृढ होती, असं चीनचं सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सनं म्हटलंय. ग्लोबल टाईम्सनं शरीफ यांचं कौतुक करत ते अशा कुटुंबातील आहेत, ज्यांनी कायमच चीन आणि पाकिस्तानच्या मजबूत संबंधांसाठी समर्थन केलं. आता इम्रान खान यांच्या कार्यकाळापेक्षाही अधिक मजबूत संबंध होतील असंही ग्लोबल टाईम्सनं म्हटलंय.