शेहबाज शरीफ दुसऱ्यांदा बनले पाकिस्तानचे पंतप्रधान; पीटीआय उमेदवाराचा दारुण पराभव...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2024 02:50 PM2024-03-03T14:50:35+5:302024-03-03T14:52:13+5:30
Shehbaz Sharif Pakistan PM: शेहबाज शरीफ माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे धाकटे भाऊ आहेत. शाहबाज यांच्या रुपाने देशाचे नेतृत्व पुन्हा एकदा शरीफ घराण्याच्या हाती गेले आहे.
Pakistan New Prime Minister: पाकिस्तानमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेले राजकीय संकट आज अखेर संपुष्टात आले. पाकिस्तान मुस्लिम लीग (एन)चे ज्येष्ठ नेते शेहबाज शरीफ यांची पुन्हा एकदा पाकिस्तानचे पंतप्रधानपदी निवड झाली आहे. रविवारी (3 मार्च 2024) मतदानानंतर त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. शेहबाज शरीफ यांच्या रुपाने देशाचे नेतृत्व पुन्हा एकदा शरीफ घराण्याच्या हाती गेले आहे. दरम्यान, इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाचे नेते उमर अयुब खान यांनी शरीफ यांच्या विरोधात पंतप्रधानपदासाठी अर्ज दाखल केला होता.
कोणाला किती मते मिळाली?
रविवारी पाकिस्तानच्या संसदेत पंतप्रधान निवडीसाठी मतदानाला सुरुवात झाली. शेहबाज यांनी त्यांच्या प्रतिस्पर्ध्यावर 100 हून अधिक मतांची आघाडी घेतली. शेहबाज शरीफ यांना एकूण 201 मते मिळाली, तर पीटीआयचे उमर अयुब खान यांना फक्त 92 मते मिळाली. यानंतर पाकिस्तानचे नवे पंतप्रधान म्हणून शेहबाज शरीफ यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. शेहबाज शरीफ सोमवारी पंतप्रधानपदाची शपथ घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
Shehbaz Sharif becomes Pakistan's Prime Minister for a second time
— Press Trust of India (@PTI_News) March 3, 2024
पीपीपी आणि एमक्यूएमसोबत युती
पाकिस्तानमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. यानंतर नवाझ शरीफ यांचा पक्ष पीएमएल-एनने, पीपीपी आणि एमक्यूएम यांनी एकत्र येत सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणि आज अखेर पाकिस्तानला नवे सरकार मिळाले आहे. विशेष म्हणजे, शेहबाज शरीफ, हे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे धाकटे भाऊ आहेत. शेहबाज शरीफ यापूर्वी एप्रिल 2022 ते ऑगस्ट 2023 पर्यंत पाकिस्तानचे पंतप्रधान होते.
निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या?
पाकिस्तानमध्ये 8 फेब्रुवारी रोजी सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान आणि त्याच दिवशी मतमोजणीदेखील झाली होती. यामध्ये पीएमएल-एन पक्षाला 75, तुरुंगात कैद असलेल्या इम्रान खान यांच्या पक्षाने पाठिंबा दिलेले 90 पेक्षा जास्त अपक्ष आणि पीपीपी पक्षाला 54 जागा मिळाल्या होत्या. निवडणूक आयोगाने इम्रान खान यांच्या पक्षावर बंदी घातल्यामुळे त्यांच्या उमेदवारांना अपक्ष निवडणूक लढवावी लागली होती. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या पीएमएल-एन सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला. आज अखेर शाहबाज शरीफ पंतप्रधान झाले.