Pakistan News: इम्रान खान यांना फाशी देण्याची मागणी; जामीन देणाऱ्या न्यायाधीशाच्या हकालपट्टीची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2023 05:30 PM2023-05-15T17:30:43+5:302023-05-15T17:32:09+5:30
पाकिस्तानात परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. देशभरात विविध ठिकाणी आंदोलने होत आहेत.
Pakistan News: भारताच्या शेजारील देश पाकिस्तानात परिस्थिती बिकट झाली आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अटकेविरोधात देशभरात आंदोलने होत आहेत. अनेक सरकारी संस्थांवर इम्रान समर्थकांकडून हल्ले होत आहेत. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाकडून इम्रान यांना जामीन मिळाल्यानंतर इम्रानविरोधी राजकीय पक्ष एकवटले आहेत. इम्रानच्या सुटकेच्या निषेधार्थ सर्वपक्षीय सर्वोच्च न्यायालयाबाहेर निदर्शने करत असून, संसदेतही इम्रान खान यांना फाशी देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
नॅशनल असेंब्लीतील विरोधी पक्षनेते राजा रियाझ अहमद खान यांनी इम्रान खान यांना जाहीरपणे फाशी देण्याची मागणी केली आहे. इम्रानच्या सुटकेच्या विरोधात पाकिस्तान डेमोक्रॅटिक मूव्हमेंट सर्वोच्च न्यायालयासमोर निदर्शने करत आहे. PDM ही सत्ताधारी पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज, जमियत उलेमा-ए-इस्लाम-फझल (JUIF) आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी (PPP) यासह अनेक पक्षांची युती आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. सध्या लाहोरमध्ये पुढील सात दिवस कलम 144 लागू करण्यात आले आहे.
सरन्यायाधीशांना हटवण्याची तयारी
सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश उमर अता बंदियाल यांनी इम्रान खान यांची तात्काळ सुटका करण्याचे आदेश दिले होते, त्यामुळे इम्रान खान यांना जामीन मिळाला. यानंतर पाकिस्तान सरकार उघडपणे बंदियालच्या विरोधात आले आहे. सरकारने त्यांच्या विरोधात निषेधाचा प्रस्ताव आणण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात नॅशनल असेंब्लीने एक ठराव संमत केला आहे, ज्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना हटवण्यासाठी पाच सदस्यीय समितीची मागणी करण्यात आली आहे.