Pakistan On Srinagar Sharjah Flight : आमच्या हवाई हद्दीचा वापर करू नका; श्रीनगर-शारजाह उड्डाणावर पाकिस्तान भडकला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2021 02:32 PM2021-11-03T14:32:08+5:302021-11-03T14:32:33+5:30
Pakistan Closed Air Space for India Flight : श्रीनगर ते शारजाह अशा सुरू झालेल्या विमान सेवेवरून पाकिस्तानचा रागराग.
Pakistan Closed Air Space for India Flight : अनेकदा तोंडघशी पडूनही पाकिस्तान आपल्या नापाक कारवायांपासून बाहेर येत नाही. श्रीनगर ते शारजाह दरम्यान सुरू करण्यात आलेल्या विमानसेबेवरून आता पाकिस्तानला राग अनावर झाल्याचं दिसून येत आहे. पाकिस्ताननं या विमानाच्या आपल्या हवाई हद्दीतून उड्डाणास बंदी घातली आहे. त्यामुळे आता या विमानाला लांब फेरा घेऊन शारजाहला जावं लागत आहे.
काश्मीरमधून ही विमानसेवा सुरू झाल्यामुळे पाकिस्ताननं संताप व्यक्त केला असल्याचं म्हटलं जात आहे. यापूर्वीही काश्मीरमधून जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी आपली हवाई हद्द वापरण्यास पाकिस्ताननं बंदी घातली होती. दरम्यान, पाकिस्ताननच्या आपली हवाई हद्द वापरण्यास बंदी घातल्याचा प्रकार हा दुर्देवी असल्याची प्रतिक्रिया जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली.
Very unfortunate. Pakistan did the same thing with the Air India Express flight from Srinagar to Dubai in 2009-2010. I had hoped that @GoFirstairways being permitted to overfly Pak airspace was indicative of a thaw in relations but alas that wasn’t to be. https://t.co/WhXzLbftxf
— Omar Abdullah (@OmarAbdullah) November 3, 2021
"हे अतिशय दुर्देवी आहे. २००९-१० मध्ये श्रीनगर येथून दुबईला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाबाबतही पाकिस्ताननं असंच केलं होतं. मला आशा होती की गो फर्स्टच्या विमानाला देण्यात आलेली मंजुरी ही दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्याचे संकेत होतं. परंतु असं व्हायचं नव्हतं," अशी प्रतिक्रिया ओमर अब्दुल्ला यांनी दिली.
गो फर्स्टनं सुरू केली होती सेवा
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी २३ ऑक्टोबर रोजी श्रीनगर-शारजाह विमानाला हिरवा झेंडा दाखवला होता. गो फर्स्टनं ही सेवा सुरू केली होती. श्रीनगर ते शारजाह अशी थेट आंतराष्ट्रीय उड्डाण आमइ कार्गो सेवा देणारी ही पहिली विमान कंपनी आहे. या दोन ठिकाणांदरम्यान आठवड्याला चार विमानांचं उड्डाण केलं जाणार आहे. दरम्यान, पाकिस्तानी हवाई हद्दीतील उड्डाणासाठी परवानगी घेण्यात आली नव्हती असा दावा पाकिस्तानी माध्यमांकडून करण्यात आला होता. त्यानंतर पाकिस्तानचे माजी राजदूत अब्दुल बासित यांनी यावरू इम्रान खान सरकारला घेरलं होतं. विमान कंपनीनं पाकिस्तानची परवानगी घेतली होती का नाही हे पाकिस्तानचं सरकारच सांगू शकेल असंही ते एका कार्यक्रमादरम्यान म्हणाले होते.