पाकची सेना भारताबरोबर युद्धाच्या स्थितीत नाही, पाकमधल्या संरक्षणतज्ज्ञाचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2019 02:09 PM2019-08-19T14:09:09+5:302019-08-19T14:10:09+5:30
भारत आणि पाकिस्तानमध्ये वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाक नेहमीच भारताला युद्धाच्या धमक्या देत असतो.
इस्लामाबादः भारत आणि पाकिस्तानमध्ये वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाक नेहमीच भारताला युद्धाच्या धमक्या देत असतो. पाकिस्तानच्या त्याच धमकीची आता पाकिस्तानमधल्या संरक्षणतज्ज्ञ लेखिका आयशा सिद्दिकी यांनी पोलखोल केली आहे. आमचा देश भारताशी युद्ध करण्याच्या तयारीत नाही. पाकिस्तानची अर्थव्यवस्था सध्या गंभीर मंदीचा सामना करत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानच्या चलनातही वारंवार घसरण होत आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तान भारतबरोबर युद्ध करू शकत नाही. तसेच मी माझ्या पाकव्याप्त काश्मीरमधल्या एका मित्राला विचारलं की, पाकिस्तान भारताशी युद्ध छेडू शकतो का, तर तो बोलला पाकिस्तानच्या सेनेचा पराभव होईल.
पाकिस्तानमधल्या सामान्य व्यक्तीलाही वाटतं की पाकिस्ताननं युद्ध छेडल्यास त्यांचा पराभव अटळ आहे. तत्पूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला युद्धाची धमकी दिली होती. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी गुरुवारी ट्विट करुन काश्मीर प्रश्नावर जगातील देशांनी वेळीच लक्ष दिलं नाही तर जगातील मुस्लिमांना कट्टरता वाढून हिंसाचाराला बळ मिळेल असा दावा केला आहे. कलम 370 हटविल्यानंतर बिथरलेले पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ट्विटमध्ये लिहिलंय की, हे जग काश्मीरमध्ये मुस्लिमांवर होणारा अन्याय बघत राहणार का? जिहादच्या नावाखाली पाकिस्तानकडून जगातील अन्य देशांना घाबरविण्याचा प्रकार सुरु झाला आहे. जर जगाने काश्मीर प्रश्नी वेळीच लक्ष दिलं नाही तर त्याचे परिणाम गंभीर होतील, त्याचे पडसाद जगातील मुस्लिमांवर होऊन कट्टरता वाढेल आणि हिंसाचाराला सुरुवात होईल.
भारताने 5 ऑगस्ट रोजी जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 संविधानातून हटविण्याचा आणि जम्मू काश्मीरचं विभाजन करुन लडाख हे स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश करण्याचं जाहीर केले. भारताच्या या ऐतिहासिक निर्णयावर पाकिस्तानकडून विरोध होऊ लागला. त्यामुळे जगभरातील देशांकडून पाठिंबा मिळावा यासाठी पाकच्या पंतप्रधानांनी प्रयत्न सुरु केले मात्र त्यांच्या हाती काहीच लागलं नाही.
पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशात जर युद्ध झालं तर त्यासाठी जगातील अन्य देश जबाबदार असतील असं वक्तव्य केलं. पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारताकडून मोठी कारवाई होऊ शकते या भीतीने पाकिस्तानमध्ये घबराट पसरली आहे. तर दुसरीकडे भारताला युद्धाची धमकी देत आहे. भारतानं असं काही केल्यास आम्हीही युद्ध करण्यासाठी सज्ज असल्याचं इम्रान खान म्हणाले होते.