जगातील टॉप 25 शक्तिशाली देशांमध्ये पाकिस्तानचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2018 06:41 PM2018-07-09T18:41:02+5:302018-07-09T18:43:32+5:30
अमेरिकेतील एका आंतरराष्ट्रीय संस्थेच्या सर्व्हेक्षणानुसार जगातील सर्वात शक्तिशाली 25 देशांची यादी जाहीर झाली आहे. त्यामध्ये भारताचाही समावेश झाला आहे. पण..
न्यूयॉर्क - जगातील सर्वात शक्तिशाली 25 देशांची यादी जाहीर करण्यात आली. युएस न्यूज अँड वर्ल्डने ही यादी प्रकाशित केली आहे. या संस्थेकडून दरवर्षी हा अहवाल प्रकाशित करण्यात येतो. या यादीत प्रथम क्रमांकावर अमेरिका आहे. तर दुसरा नंबर रशियाचा लागतो. चीन तिसऱ्या स्थानावर असून भारताचा 15 वा नंबर आहे. या यादीत पाकिस्तानलाही संधी मिळाली आहे.
युएस न्यूज अँड वर्ल्ड या संस्थेने जगभरातील देशांच्या अर्थव्यवस्थेच्या आधारावर जगातील 25 शक्तिशाली देशांची यादी एका अहवालाद्वारे सादर केली. संबंधित देशाची अर्थव्यवस्था, दुसऱ्या देशावर या देशाचा पडणारा प्रभाव, लष्कर आणि नेतृत्वाच्या आधारावर हे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. या यादीत अमेरिका प्रथम क्रमांकासह सर्वात शक्तिशाली देश ठरला आहे. अमेरिकेची अर्थव्यवस्था अत्यंत प्रभावी असून त्यांच्याकडे मोठी लष्कर यंत्रणा आहे. दुसऱ्या स्थानावर व्लादिमीर पुतीन यांच्या रशियाचा नंबर आहे. रशियाची अर्थव्यवस्था जगातील सर्वात प्रभावशाली देशांपैकी एक आहे. रुसकडून लष्करावर सर्वाधिक खर्च करण्यात येतो. सन 2016 साली रुसने आपला 5.4 जीडीपी केवळ लष्करी यंत्रणेवर खर्च केला होता. चीनची अर्थव्यवस्था सध्या गतीमान होत असल्याने चीन तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. चीनचा जगभरात प्रभाव वाढत आहे, पण मानवाधिकार, सेंसॉरशीप आणि माध्यमांच्या स्वातंत्र्याबद्दलच्या तक्रारीमुळे चीनवर जगभरातून टीका होत आहे. भारत हा जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे. तसेच भारताच्या अर्थव्यवस्थेत वेगाने वाढ होत असून भारत आयटी क्षेत्राचे महत्त्वाचे केंद्र बनल्याचेही या अहवालात सांगण्यात आले आहे. मात्र, वाढती लोकसंख्या आणि गरिबी या भारतासमोरील मोठ्या समस्या आहेत. दरम्यान, या यादीत पाकिस्तानला 22 वे स्थान मिळाले आहे. पाकिस्तान तरुण लोकसंख्येचा देश असून अंतर्गत संघर्षामुळे गरिबीत असल्याचा उल्लेख अहवालात करण्यात आला आहे.