पाकिस्तानात सत्तापालट अटळ? इम्रान खान यांची खुर्ची धोक्यात; गच्छंतीसाठी विरोधक एकवटले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 08:53 AM2022-02-14T08:53:01+5:302022-02-14T08:55:40+5:30
अनेक आघाड्यांवर अपयशी ठरलेल्या इम्रान खान यांचं पंतप्रधानपद धोक्यात; विरोधक एकवटल्यानं खान चिंतेत
इस्लामाबाद: पाकिस्तानात सत्ताबदल होण्याचे संकेत मिळत आहेत. जवळपास सगळ्याच आघाड्यांवर अपयशी ठरलेल्या पंतप्रधान इम्रान खान यांना हटवण्याची तयारी विरोधकांनी सुरू केली आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून विरोधकांची आघाडी असलेल्या पाकिस्तान डेमोक्रॅटिक मूव्हमेंटनं सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याचा निर्णय घेतला आहे. इम्रान खान यांच्या घरातही सारं काही आलबेल नाही. त्यांची तिसरी पत्नी बुशरा बिबी घर सोडून गेली आहे.
विरोधकांच्या आघाडीनं इम्रान खान सरकारविरोधात पाकिस्तानच्या संसदेत अविश्वास प्रस्ताव आणण्याची तयारी सुरू केली आहे. विरोधकांच्या आघाडीत बिलावल अली झरदारी भुट्टो यांचा पाकिस्तान पीपल्स पक्ष, नवाज शरीफ यांचा पाकिस्तान मुस्लिम लीग आणि इम्रान खान सरकारमधील मित्र पक्ष मुत्ताहिदा कौमी मुव्हमेंटचा समावेश आहे. हे सारेच पक्ष सरकारविरोधात एकवटले आहेत.
कोणाला मिळणार पंतप्रधानपद?
इम्रान खान यांना पंतप्रधानपद गमवावं लागल्यास त्यांच्या जागी पाकिस्तान पीपल्स पक्षाच्या आसिफ अली झरदारी यांना संधी मिळू शकते. माजी पंतप्रधान नवाज शरीफ आता पंतप्रधान पदाच्या शर्यतीत नाहीत. निवडणुकीच्या आधी प्रचारात दिलेली आश्वासनं पूर्ण करण्यात अपयशी ठरल्याची कबुली गेल्याच आठवड्यात इम्रान खान यांनी दिली. खान यांनी याचं खापर प्रशासकीय यंत्रणेवर फोडलं. व्यवस्थेत असलेल्या त्रुटींमुळे देशात आवश्यक बदल घडवता आले नाहीत, असं खान यांनी म्हटलं होतं.
खान यांच्याविरोधात अविश्वास ठराव प्रस्ताव आणणार असल्याच्या वृत्ताला पाकिस्तान डेमोक्रॅटिक मूव्हमेंटनं दुजोरा दिला. पीडीएमचे प्रमुख मौलाना फजलूर रहमान यासंदर्भात सरकारच्या मित्रपक्षांशीदेखील संपर्क साधणार आहेत. संसदेत अविश्वास प्रस्तावाच्या बाजूनं अधिक मतदान व्हावं यासाठी विरोधकांचे प्रयत्न सुरू आहेत. पाकिस्तानात महागाई प्रचंड वाढली असून त्याचा फटका सामान्यांना बसत आहे.