पाकिस्तानमध्ये पेट्रोलसाठी भयानक परिस्थीती! लोकांनी एक लिटर पेट्रोलसाठी लावल्या लांबच लांब रांगा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2023 04:19 PM2023-02-08T16:19:45+5:302023-02-08T16:20:57+5:30
पाकिस्तान मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. गेल्या काही दिवसापासून पाकिस्तानमध्ये पीठ, गहू, तांदुळाचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.
पाकिस्तान मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. गेल्या काही दिवसापासून पाकिस्तानमध्ये पीठ, गहू, तांदुळाचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. तर दुसरीकडे पेट्रोल, डिझेलचे दरही वाढले आहेत. पाकिस्तानातून सतत पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा असल्याच्या बातम्या येत आहेत. आणि पुन्हा एकदा देशभरातील अनेक शहरांतील पेट्रोल पंपांकडे लोक धावत आहेत. कारण सरकारच्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीशी सुरू असलेल्या चर्चेचा परिणाम म्हणून पेट्रोल-डिझेल महाग होण्याची भीती पाकिस्तानातील लोकांना आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींबाबत लोकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. या भीतीमुळे देशभरातील पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा लागल्या आहेत.फैसलाबाद, गुजरांवाला, सरगोधा, खुशाब, गोजरा आणि चिलसह इतर शहरांमध्ये पेट्रोल पंपावर तासनतास रांगेत उभे राहून लोक पेट्रोलसाठी आपली पाळी येण्याची वाट पाहत आहेत.
पंप मोटरसायकल मालकांना केवळ 200 रुपयांचे पेट्रोल आणि कार मालकांना 500 रुपयांचे पेट्रोल देत आहे. त्याचबरोबर अनेक पंपांवर पेट्रोलचा तुटवडा निर्माण झाला आहे. दुसरीकडे पेट्रोल पंप मालकांनी पेट्रोलियम पदार्थांच्या वितरकांनी पुरवठा रोखल्याचे सांगितले आहे. व्यापारी आणि उद्योग सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परकीय चलनाच्या साठ्यात घट झाल्यामुळे बँकांनी आयातीसाठी वित्तपुरवठा आणि पेमेंट सुविधा बंद केल्या आहेत.
पाकिस्तानच्या आयात उत्पादनांमध्ये पेट्रोलियम उत्पादनांचा मोठा वाटा आहे. पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा आणि वाहनांच्या लांबलचक रांगा असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. 15 फेब्रुवारीपूर्वी पेट्रोलच्या दरात वाढ होण्याची शक्यता नसल्याचे मंत्र्यांनी म्हटले आहे.