Pakistan: पाकिस्तानात काळजीवाहू पंतप्रधानपदाचा तिढा, राजकीय नाट्य दुसऱ्या दिवशीही कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2022 08:31 AM2022-04-05T08:31:38+5:302022-04-05T08:32:11+5:30
Pakistan Politics: इम्रान खान सरकारवरील अविश्वासदर्शक ठराव फेटाळला गेल्यानंतर नॅशनल असेम्ब्ली बरखास्त करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे पाकिस्तानात निर्माण झालेले राजकीय नाट्य दुसऱ्या दिवशीही कायम राहिले.
इस्लामाबाद : इम्रान खान सरकारवरील अविश्वासदर्शक ठराव फेटाळला गेल्यानंतर नॅशनल असेम्ब्ली बरखास्त करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे पाकिस्तानात निर्माण झालेले राजकीय नाट्य दुसऱ्या दिवशीही कायम राहिले. इम्रान खान यांनी सोमवारी काळजीवाहू पंतप्रधान म्हणून माजी सरन्यायाधीश गुलजार अहमद यांच्या नावाची शिफारस केली. मात्र, विरोधी पक्षनेते शाहबाज शरीफ यांनी ही संपूर्ण प्रक्रियाच बेकायदेशीर असल्याचे सांगत नाव सुचविण्यास नकार दिला. त्यामुळे पाकिस्तानात काळजीवाहू पंतप्रधानपदाचा तिढा निर्माण झाला आहे.
नॅशनल असेम्ब्ली बरखास्त झाल्यानंतर अध्यक्ष अरीफ अल्वी यांनी इम्रान खान आणि विरोधी पक्षनेते शाहबाज शरीफ यांना पत्र लिहून काळजीवाहू पंतप्रधानपदासाठी नाव सुचविण्याचे आवाहन केले होते. नॅशनल असेम्ब्ली बरखास्त केल्यापासून तीन दिवसांच्या आत काळजीवाहू पंतप्रधानपदावर योग्य व्यक्तीची निवड करणे बंधनकारक असते.
मात्र, ही गोष्ट मान्य नसल्यास त्या पदासाठी इम्रान खान व शहबाज शरीफ यांनी प्रत्येकी दोन नावे त्यासंदर्भात स्थापन केलेल्या समितीला सुचवावीत, असे अध्यक्ष अल्वी यांनी पत्रात नमूद केले होते. त्यानुसार इम्रान यांनी दोन नावे सुचवली असून त्यातील एक नाव माजी सरन्यायाधीश गुलजार अहमद असे आहे. दुसरे नाव मात्र उघड करण्यात आलेले नाही. (वृत्तसंस्था)
सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी
इम्रान सरकारवरील अविश्वासाचा ठराव फेटाळण्याच्या निर्णयाविरोधात विरोधी पक्षांनी दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने उद्या, मंगळवारपर्यंत पुढे ढकलली आहे. नॅशनल असेम्ब्ली बरखास्त करण्याच्या निर्णयालाही विरोधी पक्षांनी न्यायालयात आव्हान दिले आहे. सरन्यायाधीश उमर अता बंदियाल यांच्या नेतृत्वाखालील विस्तारित खंडपीठापुढे या याचिकेची सुनावणी होत आहे.
प्रक्रिया बेकायदेशीर ठरवून त्यात भाग घेण्यास स्पष्टपणे नकार
काळजीवाहू पंतप्रधानपदासाठी नाव सुचविण्याची प्रक्रिया बेकायदेशीर असून त्यात मी भाग घेणार नाही, असे शहबाज शरीफ यांनी स्पष्ट केले. शरीफ यांच्या वक्तव्याबद्दल माहिती खात्याचे माजी मंत्री फवाद चौधरी म्हणाले की, आम्ही काळजीवाहू पंतप्रधानपदासाठी दोन नावांची शिफारस केली आहे.
शाहबाज यांनी काळजीवाहू पंतप्रधानपदासाठी नावे न सुचविल्यास इम्रान खान यांनी सुचविलेल्या दोन नावांतून एकाच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात येईल. काळजीवाहू पंतप्रधानपदासाठी गुलजार अहमद यांचे नाव आमच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाच्या समितीने एकमताने मुक्रर केल्याचेही चौधरी यांनी स्पष्ट केले.