Pakistan Petrol-Diesel Price Hike: पाकिस्तानी भिरभिरले! पेट्रोल, डिझेलच्या दरांत अचानक ३० रुपयांची वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 07:56 AM2022-05-27T07:56:49+5:302022-05-27T07:57:16+5:30
परदेशी बँकांनीदेखील पाकिस्तानच्या रिफायनरींना कच्चे तेल खरेदी करण्यासाठी व्यापारी कर्ज देण्यास नकार दिला आहे. तर पुरवठादार देशातील राजकीय परिस्थिती बिघडल्याने आगाऊ रक्कम देण्याची मागणी करत आहेत.
इस्लामाबाद: श्रीलंकेवर आलेली परिस्थिती आता पाकिस्तानवरदेखील आली आहे. राजकीय परिस्थिती बिघडत चाललेली असताना पेट्रोल, डिझेलच्या किंमतींमध्ये अचानक वाढ झाल्याने आगीत तेल ओतण्याचे काम झाले आहे. पाकिस्तानातपेट्रोल, डिझेलच्या किंमतीत एकाचवेळी ३० रुपयांची प्रति लीटरमागे वाढ करण्यात आली आहे.
गुरुवारी याची घोषणा करण्यात आली. हे दर मध्यरात्रीपासून लागू झाले. यामुळे इस्लामाबादमध्ये पेट्रोलचा दर 179.85 पाकिस्तानी रुपये आणि डिझेलचा दर 174.15 रुपये प्रति लीटरवर गेला आहे. तर रॉकेलच्या दरातही वाढ झाली असून तो 155.95 रुपये प्रति लीटर झाला आहे.
गेल्या दोन वर्षांपासून पाकिस्तानी लोक महागाईत होरपळले आहेत. आता या इंधनवाढीमुळे वस्तू आणखी महागणार आहेत. यामुळे श्रीलंकेसारखी उद्रेकाची स्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. पाकिस्तानचे अर्थमंत्री मिफ्ताह इस्माइल यांनी गुरुवारी दरवाढीची घोषणा केली. पाकिस्तानी सरकार आणि आंतरराष्ट्रीय नाणे निधी यांच्यातील कतारमधील चर्चा निष्फळ राहिली आहे. पेट्रोल, डिझेलवरील सबसिडी बंद करा, मग पैसे देण्याबाबत पुढे बोलू असे आयएमएफने पाकिस्तानला सुनावले होते.
परदेशी बँकांनीदेखील पाकिस्तानच्या रिफायनरींना कच्चे तेल खरेदी करण्यासाठी व्यापारी कर्ज देण्यास नकार दिला आहे. तर पुरवठादार देशातील राजकीय परिस्थिती बिघडल्याने आगाऊ रक्कम देण्याची मागणी करत आहेत. या इंधन दरवाढीवर माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी टिका केली आहे. रशियाकडून ३० टक्के स्वस्त दराने इंधन मिळत होते, परंतू शरीफ सरकारने आम्ही केलेली तजवीज पुढे सुरु ठेवली नाही. त्याउलट भारताने केले आहे. रशियाकडून कच्चे तेल खरेदी केल्याने २५ रुपयांनी दर कमी करण्यात यशस्वी ठरला आहे. आता पाकिस्तानला आणखी मोठी किंमत, नुकसान चुकवावे लागणार आहे, अशा शब्दांत त्यांनी टिका केली.